‘श्यामची आई’ देणार कैदीबांधवांना मायेची ऊब
By Admin | Updated: July 2, 2014 23:15 IST2014-07-02T23:15:25+5:302014-07-02T23:15:25+5:30
कळत - नकळत हातातून झालेल्या चुकांमुळे काहींना कैदी म्हणून जीवन जगावे लागते. कारागृहात जीवन जगताना मन खिन्न होत असले तरी चुकीचा पश्चाताप करण्याची हीच खरी जागा असते.

‘श्यामची आई’ देणार कैदीबांधवांना मायेची ऊब
कारागृहात अनोखा उपक्रम: श्यामची आई पुस्तकाचे वितरण
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
कळत - नकळत हातातून झालेल्या चुकांमुळे काहींना कैदी म्हणून जीवन जगावे लागते. कारागृहात जीवन जगताना मन खिन्न होत असले तरी चुकीचा पश्चाताप करण्याची हीच खरी जागा असते. सुटका झाल्यानंतर कैद्यांना पुढील आयुष्य योग्य प्रकारे जगता यावे यासाठी कारागृहात त्यांच्यावर विविध संस्कार करण्यात येतात. मात्र या संस्कारातून ते घडतेच असे नाही. त्यांच्यात बदल घडविण्यासाठी विविध प्रयोग करण्यात येत असले तरी, पुस्तक वाचून आत्मचिंतन केल्यानंतर जो बदल घडतो, त्या बदलामध्ये जीवन घडविण्याची ताकद असते. या ताकदीला पुन्हा बळ देण्यासाठी साने गुरुजींची ‘श्यामची आई’ कैदीबांधवांना आयुष्यात आली आहे. या पुस्तकरुपी आईकडून खऱ्या अर्थाने त्यांना मायेची ऊब मिळणार आहे. गत आयुष्यात झालेल्या चुका या पुस्तकरुपी संस्कारातून सुधारण्यास वाव मिळेल, अशी आशा आहे.
नृसिंह नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने येथील कैद्यांना श्यामची आई, स्वामी विवेकानंद आणि कारागृह एक वेगळे विश्व या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.
येथील जिल्हा कारागृहात विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची संख्या ५०० च्या वर आहे. येथे जीवन कंठत असताना अनेक कैदी विविध कलाकैशल्य शिकतात. आत्मचिंतन आणि पश्चातापामुळे अनेकांत बदल घडून येतात. या बदलामुळे बाहेर निघाल्यानंतर एक सामान्य माणूस म्हणून जगण्याची त्यांच्याकडून अपेक्षा असते. काहीजण ती पूर्णही करतात. एखाद्याच्या हातून गुन्हा घडल्यानंतर आई-वडिलांनी त्यांच्यावर योग्य संस्कार केले नाहीत, असा दोष नागरिक कैद्यांच्या आईवडिलांना देतात. मात्र राग अनावर झाल्याने हा गुन्हा त्यांच्या हातून घडतो. मात्र त्यांच्या आईवडिलांना समाज अनेकववेळा नाकारतो.
आता मात्र येथील कैद्यांच्या हातात श्यामची आई पुस्तक आले आहे. त्यामुळे जन्मदात्री आई संस्कारात कमी पडली असली तरी आता ‘श्यामची आई’ कैद्यांच्या आयुष्यात नक्कीच बदल घडवून आणणार आहे. याच पुस्तकाबरोबर त्यांना स्वामी विवेकानंद आणि कारागृह एक विश्व ही पुस्तके वितरीत करण्यात आली आहे.