धनराज रामटेके लोकमत न्यूज नेटवर्कमूल : बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मूल नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत १३ कोटी रुपये खर्चुन येथील सर्व्हे न. ९०७ मधील जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाने शॉपिंग कॉम्प्लेक्सची भव्यदिव्य इमारत तयार केली. काही महिन्यांपूर्वी रीतसर उद्घाटनदेखील थाटात पार पडले. मात्र, बेरोजगारांना रोजगारासाठी दुकान कान गाळे देण्यासाठी राबविण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेत किंमत अवाढव्य असल्याने कुणीही पुढाकार घेतला नाही. यामुळे ही इमारत बेवारस पडली आहे.
आता नगर परिषदेच्या देखरेखीअभावी अज्ञात व्यक्तींनी इमारतीची तोडफोड करून अनेक वस्तू लंपास केल्या आहेत. त्यामुळे शॉपिंग कॉम्प्लेक्स दुरुस्त करून बेरोजगारांना वाजवी किमतीत गाळे देण्याची मागणी युवकांनी केली आहे.
बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने मूल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नगर परिषदेच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामासाठी १३ कोटी ७२ लाख २३ हजार ६१० रुपये मंजूर करण्यात आले. इमारतीचे बांधकाम झाल्यावर रीतसर उद्घाटन करून छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल असे नामकरण करण्यात आले. अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली. नगर परिषदेने दोनदा निविदा सूचना वर्तमानपत्रात देऊन प्रक्रिया राबविली. मात्र, शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकान गाळ्याचे भाडे व सुरक्षा रक्कम जास्त असल्याने कुणीही भाडे तत्वावर घेण्यास पुढाकार घेतला नाही. सर्वसाधारण बेरोजगार युवकांना परवडेल असे भाडे ठेवले असते, तर अनेकांचा रोजगार सुरू झाला असता.
जुन्या इमारतीत घोळनगर परिषदेच्या जुन्या इमारतीचा मागील काळात लिलाव झाला. त्यात अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कमी किमतीत गाळे घेऊन दहा पट भाडे आकारून दुसऱ्याला किरायाने दिले आहे. यावरून राजकीय नेते टाळूवरचे लोणी खात असल्याचा प्रकार दिसत असून, बेरोजगार युवक मात्र रोजगाराअभावी इतरत्र भटकताना दिसत आहेत.
"शॉपिंग कॉम्प्लेक्सची किरकोळ दुरुस्ती करून वाजवी किमतीत बेरोजगारांना गाळे उपलब्ध करून दिल्यास अनेक हातांना रोजगार मिळेल. इमारतींची देखभाल देखील व्यवस्थित ठेवण्यास मदत होईल. याकडे नगर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून गरजू बेरोजगार युवकांना गाळे देण्याची कार्यवाही करावी."- संदीप मोहुर्ले, बेरोजगार युवक मूल