खळबळजनक! तुरुंग अधिकाऱ्याचा प्रेयसीच्या घरी आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 22:42 IST2022-03-22T22:35:32+5:302022-03-22T22:42:52+5:30
Chandrapur News जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एका तुरुंग अधिकाऱ्याने आपल्या प्रेयसीच्याच घरी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजतानंतर चर्चेचा विषय ठरली.

खळबळजनक! तुरुंग अधिकाऱ्याचा प्रेयसीच्या घरी आत्महत्येचा प्रयत्न
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एका तुरुंग अधिकाऱ्याने आपल्या प्रेयसीच्याच घरी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजतानंतर चर्चेचा विषय ठरली. वेळीच उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला. ही घटना सोमवारी रात्री 10 वाजतानंतर घडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महेश माळी (37) असे या तुरुंग अधिकाऱ्याचे नाव आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हे तुरुंग अधिकारी यापूर्वी गडचिरोलीला होते. त्यांचे एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत प्रेम जुळले. माळी हे विवाहित असून त्यांना दोन अपत्य असल्याचे समजते. त्यांची प्रेयसी ही भंडारा जिल्ह्यात होती. तिची बदली चंद्रपुरात झाली. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा हे तुरुंग अधिकारी आपल्या प्रेयसीच्या घरी गेले. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला असावा. यानंतर त्याची प्रेयसी ही घराशेजारी गेली. अश्यातच तुरुंग अधिकारी माळी यांनी गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांना लगेच येथीलच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वेळेत उपचार झाल्याने ते थोडक्यात बचावल्याचे कारागृहातील सूत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी शहर पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून उपचार सुरू असल्याची माहितीही कारागृहातील सूत्राने दिली.