सिंदेवाहीची आरोग्य सेवा ढेपाळली
By Admin | Updated: December 1, 2014 22:52 IST2014-12-01T22:52:16+5:302014-12-01T22:52:16+5:30
तालुक्यात अद्यावत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सिंदेवाही येथे १९८७ मध्ये ३० खाटांचे शासकीय रुग्णालय सुरू करण्यात आले. येथे दहा वर्षांपासून स्थायी वैद्यकीय अधिक्षक नसल्याने येथील

सिंदेवाहीची आरोग्य सेवा ढेपाळली
सिंदेवाही : तालुक्यात अद्यावत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सिंदेवाही येथे १९८७ मध्ये ३० खाटांचे शासकीय रुग्णालय सुरू करण्यात आले. येथे दहा वर्षांपासून स्थायी वैद्यकीय अधिक्षक नसल्याने येथील व तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.
२५ हजार लोकसंख्या असलेल्या नगरात शासकीय ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा ढेपाळली असल्याने येथील नागरिकांना खाजगी डॉक्टरकडून सेवा घ्यावी लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सिंदेवाही तालुक्यात ११५ गावे असून ५२ ग्रामपंचायत तसेच वासेरा, मोहाळी, गुंजेवाही, नवरगाव येथे चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. याशिवाय १५ आरोग्य उपकेंद्र आहेत. सध्या येथील प्रभारी वैद्यकीय अधिक्षकांच्या खांद्यावर रुग्णालयाची धुरा आहे. या रुग्णालयात स्थायी वैद्यकीय अधिक्षक, तीन वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.), एक सहाय्यक अधिक्षक, दोन लिपीक, एक लेबॉटी टेक्नीशीयन, एक औषधी निर्माता, स्थायी महिला डॉक्टर, पाच हत्तीरोग निर्मूलन कर्मचारी व मलेरिया कर्मचाऱ्यांची पदे व नर्सची पदे रिक्त आहेत. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाचा काय उपयोग,असा नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या या रुग्णालयात प्रभारी वैद्यकीय अधिक्षक म्हणून डॉ. फुलझेले कार्यरत आहेत. तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलसंगे (आयुष), वैद्यकीय अधिकारी तसे डॉ. सुनिता लाकडे वैद्यकीय अधिकारी (बी.ए.एम.एस.) मानधनावर एक वर्षाकरिता कार्यरत आहेत. सदर रुग्णालयात २५ पदे मंजूर असून १५ पदे रिक्त आहेत. गेल्या १० वर्षांपासून स्थायी वैद्यकीय अधिक्षक नाही. स्थायी वैद्यकीय अधिक्षक पदाची पात्रता आहे.
सध्याचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. फुलझेले एम.बी.बी.एस.आहेत. या रुग्णालयात सोनाग्राफी मशीन, रक्तपेढीची व्यवस्था नाही. पुरुष रुग्ण व महिला रुग्णाकरिता तपासणी कक्ष वेगवेगळे नाही. पुरुष व महिला रुग्णांना एकाच कक्षात तपासणी करावी लागते. स्थायी महिला वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे महिला रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णालयातील ओपीडीमध्ये दररोज १०० रुग्णांची संख्या होती. सध्या दररोज ५० रुग्णांची ओपीडीमध्ये नोंद होत आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टर ओपीडी सांभाळतात. गंभीर रुग्ण व अपघातग्रस्त रुग्णांना पुरेशा सोयी अभावी केवळ प्रथमोपचार करून चंद्रपूर किंवा गडचिरोलीला पाठविण्याचा सल्ला कार्यरत वैद्यकीय अधिकारी देतात.
शासकीय ग्रामीण रुग्णालयात दोन शौचालय आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात थांबतात. त्यांना इतरत्र शौचालय व मुत्रीघराची व्यवस्था नाही. येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात स्थायी वैद्यकीय अधिक्षक तथा रिक्त असलेले वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) यांची नियुक्ती करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. तालुक्यातील ग्रामीण परिसरातील नागरिक याच आरोग्यकेंद्रात उपचारासाठी येत असल्याने अनेकवेळा त्यांना आल्यापावली वापस जावे लागते. (तालुका प्रतिनिधी)