‘ती’ शिक्षिका व मुख्याध्यापिका फरारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2017 00:41 IST2017-07-09T00:41:54+5:302017-07-09T00:41:54+5:30
विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत खोडतोड करून त्याला नापास करणे व इमारत फंडसाठी दोन लाख रुपयांची मागणी करणे, ..

‘ती’ शिक्षिका व मुख्याध्यापिका फरारच
माऊंटमधील उत्तरपत्रिका खोडतोड प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत खोडतोड करून त्याला नापास करणे व इमारत फंडसाठी दोन लाख रुपयांची मागणी करणे, या प्रकरणात गुन्हे दाखल असलेली माऊंट कार्मेल कान्व्हेंट हॉयस्कूल मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिका पोलिसांच्या लेखी फरारच असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पीडित विद्यार्थ्याचे वडील राजेश ठाकूर यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार केली होती. त्यांचा मुलगा मागील सत्रात इयत्ता नववीत शिकत होता. या विद्यार्थ्याने इयत्ता नवव्या वर्गाची परीक्षा दिली. तत्पूर्वी त्याने वर्गशिक्षिका सना सागर खत्री यांच्याकडे एसएसटी या विषयाची ट्युशन लावली होती. मात्र काही कारणामुळे या विद्यार्थ्याने मध्येच या शिक्षिकेकडून ट्युशन बंद केली. त्यामुळे संतापलेल्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला वर्गात त्रास देणे सुरू केले. त्यानंतर प्रि-बोर्ड -२ च्या परीक्षेत विद्यार्थ्याला एसएसटी विषयात नापास करण्यात आले होते. त्यांनी ही बाब शाळेच्या मुख्याध्यापिका नित्या जोसेफ यांच्या लक्षात आणून दिली होती. मात्र त्यांनी ठाकूर यांना न्याय देण्याऐवजी शाळेच्या इमारतीसाठी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. ठाकूर यांनी हा नियमबाह्य इमारत फंड देण्यास नकार दिला. त्यानंतर ठाकूर यांच्या मुलाला नवव्या वर्गाच्या शेवटच्या परीक्षेत अनुत्तिर्ण करण्यात आले. माहिती अधिकारात त्यांनी उत्तरपत्रिका मागितली असता त्यात गुणांकनामध्ये खोडतोड केल्याचे ठाकूर यांना लक्षात आले. लगेच त्यांनी सीबीएसई बोर्ड, शिक्षणाधिकारी व पोलिसात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिका यांच्याविरुध्द भादंवी कलम ४६८, ४७१, ४२० (३४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या दोघींचाही शोध घेत आहेत.
गुणवत्तेसाठीही घडला होता असाच प्रकार
दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून कमी हुशार विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून पाल्याची टीसी घेऊन जाण्याचा फतवाही या शाळेने काही दिवसांपूर्वी काढला होता. मध्येच टीसी घेऊन पाल्यांना कोणत्या शाळेत प्रवेशित करावे, असा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला होता. नंतर पालकांनी याबाबत शाळा व्यवस्थापनाविरोधात आवाज उठविल्यानंतर हा फतवा मागे घेण्यात आला होता.