एक मुलगा, तीन मुली असतानाही तिला आले एकाकी मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:33 IST2021-09-17T04:33:45+5:302021-09-17T04:33:45+5:30

नागभीड : बाळापूर (खुर्द) येथील एका वृद्ध महिलेचा मृतदेह घरातच पडून होता. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने चौकशी करण्यात ...

She had a son and three daughters, but she died alone | एक मुलगा, तीन मुली असतानाही तिला आले एकाकी मरण

एक मुलगा, तीन मुली असतानाही तिला आले एकाकी मरण

नागभीड : बाळापूर (खुर्द) येथील एका वृद्ध महिलेचा मृतदेह घरातच पडून होता. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने चौकशी करण्यात आली, तेव्हा ती मरण पावली असल्याचे लक्षात आले.

जिराबाई मुखरू भुते (वय ६०) असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. १२ सप्टेंबर रोजी जिराबाई शेतातील निंदन करून संध्याकाळी घरी आली. त्यानंतर घराबाहेर दिसलीच नाही. जिराबाई घरी एकटीच राहत होती. जिराबाईचा मुलगा नाशिक येथे कामाला आहे. तिला तीन मुली असल्या तरी तिन्ही मुलींचे लग्न होऊन त्या सासरी गेल्या आहेत.

बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास जिराबाईच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे गावकऱ्यांना संशय आला. पोलीस पाटील हिवराज गोंगल यांनी लागलीच नागभीड पोलीस ठाण्यास ही माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद मडामे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जिराबाईच्या घराचे दार आतून बंद असल्याने लोकांच्या मदतीने दार उघडून पाहिले असता जिराबाई खाटेवर मरण पावलेल्या अवस्थेत दिसून आली. पोलिसांनी गावकऱ्यांसमक्ष पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठविण्यात आला. तिचा मृत्यू कशामुळे झाला, हे शवविच्छेदनानंतर पुढे येईल. मृत वृद्धेचे जावई शांताराम राऊत यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन नागभीड येथे प्रकरण दाखल करण्यात आले असून, पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.

Web Title: She had a son and three daughters, but she died alone