सावली व कावळगोंदी येथे आगीत तीन घरे जळाली
By Admin | Updated: May 24, 2017 02:11 IST2017-05-24T02:11:06+5:302017-05-24T02:11:06+5:30
आग लागल्याने मंगळवारी सावली येथे दोन घरे आणि राजुरा तालुक्यातील कावळगोंदी येथे एक घर जळून भस्मसात झाले.

सावली व कावळगोंदी येथे आगीत तीन घरे जळाली
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली/राजुरा : आग लागल्याने मंगळवारी सावली येथे दोन घरे आणि राजुरा तालुक्यातील कावळगोंदी येथे एक घर जळून भस्मसात झाले. त्यामध्ये घरमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कावळगोंदीत आगामुळे जनावरांचे दोन गोठेही जळाले.
सावली येथील वार्ड क्र. १३ च्या सावित्रीबाई फुले चौकात मंगळवारी सकाळी ११ वाजता शॉर्ट सर्कीट होऊन अचानक आग लागली. त्यामध्ये आबाजी कावळे यांचे घर, गोठ्यातील साहित्य व एक वासरू भाजले. ही आग पसरल्याने पत्रू रघुनाथ लेनगुरे यांचे घर, अंगणातील धानाचे १७ पोते जळाले.
गुलाबशाह बाबा कॉन्व्हेंटच्या बाजूला असलेल्या तणासाच्या ढिगाऱ्याजवळ विद्युत तारा एकमेकांना घासल्या जाऊन ठिणगी निघाली. जवळच असलेल्या तणसाच्या ढिगाऱ्याला आग लागली. आबाजी वारलू कावळे यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली. आग विझविण्यासाठी पाण्याच्या बादल्या घेऊन बालके व वयोवृद्ध नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न केले.
त्यानंतर आग पसरत पत्रू रघुनाथ लेनगुरे यांच्या घराला लागली. त्यात त्यांची धानाची २५ पोती जळाली. तसेच त्यांच्या घराची पूर्णत: नुकसान झाले. त्यांच्या घरामागे असलेला गोठाही जळून खाक झाला. त्या आगीचा भडका अतुल लेनगुरे, विवेक लेनगुरे यांचा घरापर्यंत पोहोचला. मूल येथून अग्निशमन दलाचे वाहन बोलविण्यात आले.
राजुरा तालुक्यातील कावळगोंदी येथील रवींद्र राठोड यांच्या घराला मंगळवारी पहाटे अचानक आग लागली. यावेळी त्यांच्या घरातील फ्रीज, टी. व्ही., कुलर, कपडे, धान्य आदी सर्व साहित्य जळाले. आगीमुळे राठोड यांना दुसऱ्याकडे आश्रय घ्यावा लागला. गुरांचा चारादेखील जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच कावळगोंदीचे उपसरपंच बाबाराव जाधव, राजुरा येथील कैलास कार्लेकर यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. परंतु तोपर्यंत घर पूर्णपणे जळाले. या आगीत गरीब शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. तलाठ्याने गावात येऊन घटनेचा पंचनामा केला.