पीक विमा योजनेतून सात तालुके वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:29 IST2017-07-18T00:29:45+5:302017-07-18T00:29:45+5:30
निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीरीजा हवालदिल असून नापिकीने त्रस्त आहे. बळीराजाला सावरण्यासाठी व दिलासा देण्यासाठी ...

पीक विमा योजनेतून सात तालुके वगळले
कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी बल्लारपूर तालुक्यात मोठा फटका योजनेत समावेश करा
अनेकश्वर मेश्राम । लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीरीजा हवालदिल असून नापिकीने त्रस्त आहे. बळीराजाला सावरण्यासाठी व दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेत सात तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत. जिल्ह्यात सर्वच भागात खरिपाच्या हंगामात कापसाची लागवड केली जाते. काही तालुक्यात कापूस उत्पादक शेतकरी कमी आहेत. अशा भागातील शेतकऱ्यांचे पीक विमा संरक्षण काढून घेणे, अन्यायकारक ठरले आहे. या योजनेतून कापूस पिकासाठी बल्लारपूर, मूल, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही व सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना वगळण्यात आल्याचे कारस्थान कृषी विभागाने केले आहे. यामुळे या तालुक्यातील कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यात संताप व्यक्त होत आहे.
या पीक विमा योजनेत भात, ज्वारी, सोयाबीन, तूर, कापूस, मूंग व उडीद पिकाचा समावेश आहे. या पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतातील उत्पादक पिकाचे विम्याचे संरक्षण देण्याचा पवित्रा घेतला आहे. कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असूनही सात तालुके कोणत्या कारणावरुन विमा योजनेपासून वंचित करण्यात आले, हे कोडेच आहे. अधिसूचित पिकाच्या यादीतून कापसाला कपात केल्यामुळे शेतकऱ्यांवर आघात झाला आहे. या संदर्भात बल्लारपूर तालुक्यातील कापूस उत्पादकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून योजनेत समावेश करण्याची मागणी केली होती.
आठ तालुक्यातील २७ मंडळात कापसाचे संरक्षण
पीक विमा योजनेत आठ तालुक्यातील २७ महसूल मंडळात कापूस पिकासाठी विमा संरक्षण देण्यात आले आहे. चंद्रपूर तालुक्यातील पडोली व घुग्घुस, गोंडपिपरी तालुक्यातील धाबा व गोंडपिपरी, वरोरा तालुक्यातील माढेळी, चिखली, टेमुर्डा, खांबाडा व शेगाव, भद्रावती तालुक्यातील घोडपेठ, चंदनखेडा, मुधोली व नंदोरी. चिमूर तालुक्यातील मासळ (बुज), खडसंगी, नेरी, भिसी, जांभूळघाट व शंकरपूर. राजुरा तालुक्यातील विरूर (स्टेशन) व राजुरा. कोरपना तालुक्यातील गडचांदूर व कोरपना तर जिवती तालुक्यात पाटण व जिवती या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कापसाचा विमा काढण्याची मुभा देण्यात आली आहे.
तालुक्यात तीन हजार हेक्टर क्षेत्राला विमा नाही
बल्लारपूर तालुक्यात एकूण खरीप पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र नऊ हजार ३७९ हेक्टरचे असून सहा हजार ७६५ हेक्टर क्षेत्रात पेरणी केली जाते. यातील तीन हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड केली जाते. अर्धे अधिक पेरणीचे क्षेत्र कापसाचे असताना पीक विमा योजनेचे संरक्षण जाणीवपूर्वक वगळण्यात आले. परिणामी तालुक्यातील शेतकरी घायाळ झाला आहे. कापसाला विमा योजनेतून वगळून भात, ज्वारी, सोयाबीन व तूर पिकाला विम्याचे संरक्षण देण्यात आले. भात वगळता अन्य पिकाचे क्षेत्र कमी असून विम्यात स्थान देण्यात आल्याने शेतकऱ्यात नाराजी आहे.