तेंदूपान घटकातून मजुरांना मिळणार सात कोटी रूपये
By Admin | Updated: May 2, 2015 01:11 IST2015-05-02T01:11:42+5:302015-05-02T01:11:42+5:30
मध्य चांदा वन विभागातील तेंदू घटकाचा लिलाव वनविभागाने निविदेद्वारे केला आहे.

तेंदूपान घटकातून मजुरांना मिळणार सात कोटी रूपये
राजुरा : मध्य चांदा वन विभागातील तेंदू घटकाचा लिलाव वनविभागाने निविदेद्वारे केला आहे. हे घटक खाजगी कंत्राटदारांनी खरेदी केले. या घटकातून यावर्षी ३७ हजार ५०० प्रमाणीत गोणी तेंदू पानाचे संकलन केले जाणार असून त्यातून अंदाजे सात कोटी रूपये तेंदूपत्ता मजुरांना मिळणार आहे.
मध्यचांदा वन विभागातील तेंदू घटकाचा लिलाव निविदा द्वारा चार फेरीत करण्यात आला. या विभागातील बल्लारशाह रेंजमधील चार घटक, राजुरा रेंज मधील तीन घटक, कोठारी रेंजमधील सात घटक, धाबा रेंजमधील चार घटक, धाबा रेंजमधील चार घटक, विरूर रेंज दोन घटक, वनसडी रेंज एक घटक व जिवती रेंज मधील दोन घटक खासगी कंत्राटदारांनी खरेदी केले. तसेच पेसा अंतर्गत दहा घटकाची खाजगी कंत्राटदारांनी विक्री केली. पेसा अंतर्गत जिवती, पाटण, मारईपाटन, नवेगाव, पिपर्डा येथील ग्रामपंचायतीद्वारे स्वत: तेंदूपाने संकलन केले जाणार आहे.
वन विभागाच्या २३ तेंदू घटकातून २९ हजार ५७० प्रमाणीत गोणी व पेसा अंतर्गत टेंभूरवाई, भेदोडा, अंतरगाव, येरगव्हाण, देवाडा, लक्कडकोट येथील दहा युनीट मधून ७८५० प्रमाणीत गोणी संकलन केले जाणार आहे. यावर्षी वन विभागाकडून प्रती प्रमाणीत गोणी (एक हजार पुडे) संकलन करण्यास १७५० रुपये दर दिला जाणार आहे. त्यामुळे या वनविभागातील हजारो मजुरांना जवळपास सात कोटी रुपये मजुरीपोटी मिळणार आहे.
तसेच पेसा अंतर्गत जिवती, पाटण, मारईपाटण, नवेगाव, पिपर्डा येथील या ग्रामपंचायत द्वारा स्वत: तेंदूपाने संकलन करण्याचा ठराव पारित करून वनविभागास कळविल्यामुळे प्रथमच ग्रामपंचायत स्तरावरुन संकलनाचे काम करण्यात येणार आहे.
यावर्षी तेंदूपाने संकलन करण्याचे काम मे महिन्याच्या प्रथम आठवड्यात सुरू होणार आहे. तेंदू पाने संकलन करण्याचे कार्य या परिसरातील आदिवासी व गोरगरीब लोकाकडून केले जाते. त्यामुळे या हंगामाकडे गोरगरीबांनी नजर लागून असते. तेंदू हंगामामुळे मजुरांना मोठी रक्कम मिळत असल्यामुळे आर्थिक समस्या दूर होते. अल्पशा कालावधीत हजारो रुपये कमाईचे तेंदूपत्ता साधन असल्यामुळे या कामावर कुटूंबातील सर्व सदस्य कार्य करतात व नगदी रक्कम घेऊन आपली
आर्थिक टंचाईवर मात करतात. त्यामुळे तेंदूपाने हंगाम हा गोरगरीबाची पुरणपोळी म्हटले जाते. (तालुका प्रतिनिधी)