खरिपावर बियाण्यांचे संकट

By Admin | Updated: May 10, 2015 01:05 IST2015-05-10T01:05:37+5:302015-05-10T01:05:37+5:30

दरवर्षी मोठी आशा बाळगून उत्साहात मशागतीच्या कामाला लागलेल्या शेतकऱ्यांना निसर्ग दगा देत आला आहे.

Seed Crisis on Kharipa | खरिपावर बियाण्यांचे संकट

खरिपावर बियाण्यांचे संकट

रवी जवळे चंद्रपूर
निसर्गाची शेतकऱ्यांवरील अवकृपा मागील अनेक वर्षांपासून कायम आहे. दरवर्षी मोठी आशा बाळगून उत्साहात मशागतीच्या कामाला लागलेल्या शेतकऱ्यांना निसर्ग दगा देत आला आहे. २०१३ मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या हातचा खरीप हंगाम व्यर्थ गेला होता. त्यामुळे मागील वर्षी शेतकऱ्यांना बियाणे टंचाईचा सामना करावा लागला होता. अनेक जणांकडे बियाणे नसल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. कशाबशा पेरण्या केल्या. मात्र वरूणराजा पावला नाही. अनेक दिवस पावसाने दडी मारली. पुुढेही अधेमधे पाऊस गायब राहिला. त्यामुळे मागील वर्षीदेखील दुष्काळसदृश्य स्थिती राहिली. अनेक शेतकऱ्यांना अत्यल्प उत्पादन झाले. कर्ज डोक्यावर असल्याने शेतकऱ्यांनी बिजाई राखून न ठेवता आर्थिक गरज भागविण्यासाठी पीक विकून टाकले. त्यामुळे यावर्षीदेखील खरिपावर बियाण्यांचे संकट घोंगावण्याचे चिन्ह आहे.
मागील दोन वर्षामधील रोगराई, अतिवृष्टी, पूर, वरूणराजाची अवकृपा यांचा आघात सहन करून बळीराजा आता पुन्हा उसणे बळ एकवटत मातीत रमायला लागला आहे. मात्र यावर्षीही बळीदादांना अनेक संकटाचा सामना करावा लागणार असे दिसते.
२०१३ मध्ये जुलै, आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली. यात शेतकऱ्यांच्या अनेकदा पेरण्या वाहून गेल्या. काही शेतकऱ्यांना वेळ निघून गेल्यामुळे सोयाबीनच्या पेरण्या करताच आल्या नाही. काही शेतकऱ्यांच्या पेरण्या तग धरून राहिल्या. मात्र सोयाबीन हाती येत असताना पुन्हा पाऊस आला. त्यानंतर कापणी सुरू असताना पुन्हा एक महिना संततधार पाऊस बरसल्याने सोयाबीनचा दाणा सुकू शकला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला अंकूर फुटले. त्यामुळे मागील वर्षी खरीप हंगामात बियाण्यांची मोठी टंचाई जाणवली.
दरम्यान, मागील खरीप हंगामात वेळेवर मान्सून बरसला. मात्र वरूणराजाने अवकृपा दाखविणे सोडले नाही. प्रारंभी पाऊस पडल्यानंतर पावसाने अचानक दडी मारली. कित्येक दिवस पावसाचे दर्शनच झाले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. पीक भरात येत असतानाही पुन्हा पावसाने दडी मारली. यातही शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना कमी उत्पादन झाले. उत्पादन कमी असल्याने आर्थिक गरज भागविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्याकडे बिजाई राखून ठेवलेली नाही. तशा मानसिकतेही शेतकरी नाहीत, असे दिसून येत आहे.
सध्या खरीपाची तयारी सुरू आहे. लग्नसराईला बगल देत शेतकऱ्यांचीही शेतात लगबग सुरू झाली आहे. यावेळी हवामान खात्याने मान्सून वेळेवर बरसणार असे भाकित केले आहे. याशिवाय पावसाळ्यात वरूणराजाची कृपा चांगली असणार आहे, असाही हवामान खात्याचा अंदाज आहे. या वृत्तामुळे हवालदिल शेतकऱ्यांची थोडीशी आशा पल्लवित होऊ लागली आहे.
यंदा कृषी विभागानेही आपले खरीपाचे नियोजन झटपट पूर्ण केले आहे. यावेळी चार लाख ६७ हजार ६८२ हेक्टरवर जिल्ह्यात खरीप पिकांची लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यावेळी पुन्हा कापसाचा पेरा वाढणार असे दिसून येत आहे. कापसाचे एक लाख ३४ हजार ८२७ हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. तर धान एक लाख ७७ हजार ६८ हेक्टर व एक लाख १८ हजार ४७४ हेक्टरवर सोयाबीन पिकांची लागवड होणार आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील खरिपात बियाण्यांची टंचाई जाणवणार आहे. या हंगामात ५९ हजार ६५९ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली असून एक लाख १० हजार २०० मेट्रीक टन खतही जिल्ह्यासाठी शासनाकडून मागविण्यात आले आहे. दुसरीकडे बियाणांची टंचाई जाणवणार, हे व्यापाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यांनीही त्या दृष्टीने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Web Title: Seed Crisis on Kharipa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.