चंद्रपुरात उसळला ओबीसींचा जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 05:00 AM2020-11-27T05:00:00+5:302020-11-27T05:00:16+5:30

येथील पवित्र दीक्षाभूमी परिसरातून दुपारी १ वाजता ओबीसींच्या या विशाल मोर्चाला सुरूवात झाली. तत्पूर्वी सकाळी १० वाजतापासून चंद्रपुरात बाहेर गावावरून ओबीसी बांधवांची वाहने येऊ लागली. संबंधित पार्किगस्थळी वाहने थांबवून ओबीसी बांधव हातात पिवळे झेंडे घेत दीक्षाभूमी परिसरात दाखल होऊ लागली. दुपारी मोर्चाला सुरुवात होताच ओबीसी बांधवांमध्ये उत्साह संचारला. प्रारंभी ६ -६ च्या रांगेत निघालेल्या मोर्चाने काही वेळातच संपूर्ण रस्ता व्यापून घेतला होता.

A sea of OBCs erupted in Chandrapur | चंद्रपुरात उसळला ओबीसींचा जनसागर

चंद्रपुरात उसळला ओबीसींचा जनसागर

Next
ठळक मुद्देजातीनिहाय जनगणनेसाठी विशाल मोर्चा : शहरातील प्रमुख रस्ते मोर्चेकरांनी फुलले

चंद्रपूर : ओबीसींचे संवैधानिक हक्क, अधिकार मिळण्यासाठी तसेच ओबीसीच्या जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी संविधान दिनी गुरुवारी ओबीसी बांधवांचा चंद्रपुरात विशाल मोर्चा निघाला. या मोर्चासाठी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव चंद्रपुरात दाखल झाले होते. शहरातील प्रमुख रस्ते गुरुवारी मोर्चेकरी व त्यांच्या पिवळ्या झेंड्यांनी फुलून गेले होते. 
येथील पवित्र दीक्षाभूमी परिसरातून दुपारी १ वाजता ओबीसींच्या या विशाल मोर्चाला सुरूवात झाली. तत्पूर्वी सकाळी १० वाजतापासून चंद्रपुरात बाहेर गावावरून ओबीसी बांधवांची वाहने येऊ लागली. संबंधित पार्किगस्थळी वाहने थांबवून ओबीसी बांधव हातात पिवळे झेंडे घेत दीक्षाभूमी परिसरात दाखल होऊ लागली. दुपारी मोर्चाला सुरुवात होताच ओबीसी बांधवांमध्ये उत्साह संचारला. प्रारंभी ६ -६ च्या रांगेत निघालेल्या मोर्चाने काही वेळातच संपूर्ण रस्ता व्यापून घेतला होता. शहरातून फिरल्यानंतर चांदा क्लब ग्राऊंडवर येताच मोर्चाचा समारोप एका सभेत झाला.  
या मोर्चाची धुरा ओबीसी समन्वय समितीचे मुख्य संयोजक बळीराज धोटे, अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, अ‍ॅड. दत्ता हजारे, डॉ. राकेश गावतुरे, प्रा. सूर्यकांत खनके, प्रा. विजय बदकल, अ‍ॅड. फरहान बेग, डॉ. अभिलाषा गावतुरे, प्रा. विजय मुसळे आदींनी सांभाळली.

अन्य जिल्ह्यातून नागरिक सहभागी
हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी ओबीसी जनगणना समन्वय समितीसह सर्व स्तरातील सामाजिक संघटनांचे मोठे सहकार्य लाभले. जिल्ह्यातील चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल, सावली, राजुरा, बल्लारपूर, पोंभुर्णा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी या पंधरा तालुक्यातील कानाकोपºयासह यवतमाळ, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यातूनही ओबीसी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळे संपूर्ण महानगरात आज ओबीसीमय वातावरण दिसून आले. कोरोना काळातही पूर्णता खबरदारी घेत हा प्रेरणादायी मोर्चा ठरला. 
 

नेते जनतेत, कार्यकर्ते मंचावर
एरवी नेते मंचावर आणि कार्यकर्ते मंचासमोर बसले असतात. मात्र ओबीसी मोर्चादरम्यान मोर्चाला कोणताही राजकीय रंग प्राप्त होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे नेते मंचासमोर बसले होते. यात पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खा. बाळू धानोरकर, आ. सुभाष धोटे, आ. प्रतिभा धानोरकर, आ. किशोर जोरगेवार, जि.प. अध्यक्ष संध्या गुरुनुले, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे,  मनपा उपमहापौर राहुल पावडे, राकाँ जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, भाजपा शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, चित्रा डांगे, सुनिता अग्रवाल, संजय मारकवार आदींचा समावेश होता. तर ओबीसी कार्यकर्ते मंचावर बसले होते. 

रुग्णवाहिकेला करून दिली जागा
विशाल मोर्चा सुरू असताना स्वयंसेवकांनी ज्युबिली हायस्कुल व जटपुरा गेटजवळ रुग्णवाहिकेला पुढे जाण्याकरिता जागा उपलब्ध करून दिली. रुग्णवाहिकेला जागा उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवक तत्पर होते. स्वयंसेवकांचे निर्देश मिळताच मोर्चेकरी बाजुला होत होते. 
दिव्यांग बांधवांचीही उपस्थिती
मोर्चाला लहान मुले, महिला यांच्यासह दिव्यांग बांधवांचीही मोठी उपस्थिती होती. मोर्चाचे जवळपास सात किमी अंतर या दिव्यांग बांधवांनी पार केले.
स्वयंस्फूर्तीने ओबीसी समाज एकवटला
कोणत्याही राजकीय पक्ष किंवा नेत्यांचा आधार न घेता प्रत्येक राजकीय पक्षाचे लोकं स्वयंस्फूर्तीने ओबीसी मोर्चात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील गावा-गावातून युवा व जेष्ठ कार्यकर्ते मोठया संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
इतर समाजाचाही सहभाग
मोर्चा जरी ओबीसींचा असला तरी इतर समाजातील नागरिकांचासुद्धा मोठा सहभाग मोर्चात दिसून आला. ओबीसी समाजाचे मनोबल वाढविण्यासाठी इतर समाजातील लोकांचेही मोठे योगदान होते.
वाहतुकीसाठी आतल्या मार्गांचा वापर
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी मार्ग, कस्तुरबा मार्ग, रामनगर मार्ग, चांदा क्लब ग्राऊंड मार्ग, दीक्षाभूमी मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे चंद्रपूरकरांची मोठी तारांबळ उडाली. प्रमुख मार्गच बंद असल्याने शहरातील आतील रस्ते, गल्लीबोळातून नागरिक आपापल्या इप्सितस्थळी पोहचताना दिसले.

Web Title: A sea of OBCs erupted in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.