लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चितीची प्रक्रिया वेगात सुरू केली आहे. काँग्रेस आणि भाजपने प्रभागनिहाय इच्छुकांकडून अर्ज मागवून मुलाखती घेतल्या असल्या तरी, आम आदमी पक्ष वगळता कोणत्याही प्रमुख पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने इच्छुकांची धडधड वाढली असून, एका पक्षातून तिकीट न मिळाल्यास दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची मात्र कोंडी झाली आहे.
येथे भाजपकडून शिंदेसेनेसोबत युतीसाठी समन्वय समिती स्थापन केली आहे. समितीच्या दोन ते तीन बैठका झाल्या असल्या तरी काही प्रभागांतील उमेदवारीवरून एकमत न झाल्याने युतीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण आहे. दुसरीकडे, काँग्रेसने आघाडीबाबत अद्याप स्पष्ट भूमिका न घेतल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष त्यांच्या निर्णयाकडे लागले आहे. दरम्यान, आघाडीतील उद्धवसेनेने वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी, ज्या प्रभागांमध्ये पक्षाची ताकद आहे, तेथे उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू आहे. सोमवारी व मंगळवारी दुपारपर्यंत सर्वच पक्षांचे चित्र स्पष्ट होणार आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने बहुतांश इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला. भाजप आणि काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र सध्या आहे.
राष्ट्रवादीची १० जागांची मागणी
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने काँग्रेसकडे १० जागांची मागणी केली आहे. काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्यामध्ये रविवारी चंद्रपूरमध्ये बैठक झाली. मात्र या बैठकीत नेमके काय ठरले ते कळू शकले नाही. मात्र जागेसंदर्भात तळजोड होण्याची शक्यता आहे.
बैठकांचा सपाटा
- काँग्रेस, भाजपसह अन्य राजकीय पक्षांनी अंतर्गत बैठकांचा सपाटा लावला आहे. नेते आपल्या मर्जीतील उमेदवारांना मैदानात उतरविण्यासाठी रणनीती आखत आहेत.
- अर्ज भरण्यापर्यंत कोण कुठल्या पक्षात जाणार, तिकीट मिळाल्यास पुढची भूमिका काय असणार, यावर इच्छुक व पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.
अर्ज दिला, छाननी झाली; नाव कोणाचे ?
महानगरपालिका निवडणुकीसाठी काही प्रभागांत काँग्रेस तसेच भाजपकडे एका जागेसाठी पाच ते दहा इच्छुकांनी दावा केल्याने उमेदवार निवडताना नेत्यांची मोठी कसरत होत आहे.
Web Summary : Political parties are speeding up candidate selection for Chandrapur Municipal elections. Alliances remain uncertain. Congress, BJP interview aspirants, but haven't announced candidates. Factions vie for position. NCP seeks ten seats from Congress. Final picture expected soon.
Web Summary : चंद्रपुर महानगरपालिका चुनाव के लिए राजनीतिक दल उम्मीदवार चयन में तेज़ी ला रहे हैं। गठबंधन अनिश्चित बना हुआ है। कांग्रेस, भाजपा ने उम्मीदवारों का साक्षात्कार लिया, लेकिन अभी तक घोषणा नहीं की है। गुट पद के लिए प्रतिस्पर्धा कर रहे हैं। राकांपा ने कांग्रेस से दस सीटें मांगी हैं। अंतिम तस्वीर जल्द ही आने की उम्मीद है।