शाळा आमच्या नशिबी नाही!
By Admin | Updated: June 21, 2015 01:46 IST2015-06-21T01:46:42+5:302015-06-21T01:46:42+5:30
सोशल मिडीया आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने तरुण पिढी संपूर्ण जग कवेत घेण्याच्या प्रयत्न करीत आहे.

शाळा आमच्या नशिबी नाही!
शाहु नारनवरे विरुर (स्टे.)
सोशल मिडीया आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने तरुण पिढी संपूर्ण जग कवेत घेण्याच्या प्रयत्न करीत आहे. असे असताना, विट भट्टीवर काम करणारी व मेंढर चारणारी मुलं मात्र अद्यापही शाळा, मास्तर अन् अभ्यास या गोष्टीपासून कोसो दूर आहेत. या मुलांना अद्याप शिक्षणाचा गंध लाभला नाही.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाची ज्योत पेटविली. त्यामुळे शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचली. मात्र पुरोगामी महाराष्ट्रात अजुनही लाखो मुलं शिक्षणापासून वंचित असल्याचे वास्तव आहे. उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबाची संख्या महाराष्ट्रात मोठी आहे. या कुटुंबातील मुलांच्या नशिबी शिक्षण नाहीत. शेकडो कुटुंब मेंढर चारण्यासाठी सध्या चंद्रपूर जिल्ह्यात आली आहेत. शेतामध्ये ती आपली मेंढर चारतात. शेतातच त्यांचा डेरा असून तेथेच त्यांनी संसार थाटला आहे. त्यांच्यासोबत एक वर्षांपासून ते पंधरा वर्षांपर्यंतची अनेक मुलं आहेत. दसऱ्यानंतर शेतातील कामे व चारा संपल्यामुळे ही कुटुंब मेंढारासाठी व आपल्या पोटासाठी भटकंतीला निघाली. आता पावसाळा सुरू झाल्यानंतरच ती आपल्या गावी परत जाणार आहेत. त्यामुळे शिक्षणापासून त्याची मुलं कोसो दूर आहेत. यांपैकी काहींची नावे शाळेत टाकण्यात आली असली तरी दसऱ्यापासून तर परीक्षा संपेपर्यंत ती कधीच शाळेत जातच नाहीत. यापैकीच संजय मदन मारुभाऊ या १४ वर्षीय मुलाला विचारणा केली असता, शिक्षणाचे आमच्या जीवनात काहीच महत्त्व नाही. दसरा संपला की, आम्हाला बिऱ्हाड घेऊन कुटुंबासोबत निघाव लागतं. मेंढरं, बकऱ्या चाराव्या लागतात. कुटुंबाला सोडून गावात राहणार तर खाणार काय? असा प्रश्न त्याने केला. त्याच्या सारखीच अनेक मुलांची स्थिती आहेत. त्यांचे आई वडिलही त्यांना शिक्षणाचा नाही तर मेंढर, बकऱ्या चारण्याचा आग्रह धरतात.
राजुरा तालुक्यात अनेक विट भट्टया आहेत. या विटाभट्टयांवर मध्यप्रदेशामधील कोरकू व इतर समाजाचेही अनेक कुटुंब राबतात. तसेच छत्तीसगढमधीलही कुटुंब विटाभट्टीवर काम करतात. त्यांची मुलेही त्यांच्या सोबत राहतात. त्यांनाही शिक्षणाचा गंध नाही. शिक्षणापासून कोसोदूर आहेत.
‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, विद्यार्थ्यांनी ते प्राशन केलेच पाहिजे’ या सुविचाराप्रमाणे विकासाचे सामर्थ्य शिक्षणातच आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती शिक्षित झाला पाहिजे, कुणीही शिक्षणापासून वंचित राहु नये, तसेच शिक्षणाची गंगा घराघरात पोहचली पाहिजे असा आग्रह शासनाकडूनच धरला जातो. परंतु देशातील अनेक मुलं शिक्षणापासून कोसो दूर आहेत.