शाळा व्यवस्थापन समित्यांना लागले राजकारणाचे ग्रहण

By Admin | Updated: February 7, 2015 00:36 IST2015-02-07T00:36:07+5:302015-02-07T00:36:07+5:30

गाव तिथे प्राथमिक शाळा आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचे केल्याने ते राबविण्यासाठी ग्रामशिक्षक समितीची निर्मिती करण्यात आली.

School Management Committees began to get involved in politics | शाळा व्यवस्थापन समित्यांना लागले राजकारणाचे ग्रहण

शाळा व्यवस्थापन समित्यांना लागले राजकारणाचे ग्रहण

कोरपना: गाव तिथे प्राथमिक शाळा आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचे केल्याने ते राबविण्यासाठी ग्रामशिक्षक समितीची निर्मिती करण्यात आली. कोरपना तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या. मात्र स्थापनेच्यावेळी गाव पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपात समितीची स्थापना करण्यात आली. त्यामुळे या समितीमध्ये काम कमी आणि राजकारण जास्त केले जात असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ठासळत चालली आहे.
शाळेचा परिसर राजकारण विरहित असावा, शिक्षणाच्या विकासात लोकसहभाग असावा, या हेतुने ग्रामशिक्षण समितीचे रुपांतर शाळा व्यवस्थापन समितीत करण्यात आले. मात्र तरीही गावपुढाऱ्यांचा हस्तक्षेप आणि मत्केदारी संपुष्टात आली नसल्याने चित्र संपूर्ण कोरपना तालुक्यात दिसत आहे. प्रत्येक गावातील पुढाऱ्याला शाळा व्यवस्थापन समितीत आपल्या गटाचे किंवा राजकीय पक्षाचे लोक कसे निवडले जातील, या दृष्टीने प्रयत्न झाल्याचे पहावयास मिळते. प्रत्येक गावातील एकही बालक शाळाबाह्य राहू नये, अपंग मुलांची १०० टक्के पटनोंदणी करणे, मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे, शिक्षकांची अनियमितता आणि गैरवर्तनावर अंकुश निर्माण व्हावा म्हणून सूचना देणे, शालेय विकासासाठी आराखडा तयार करणे तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यावर भर, शिक्षकांची हजेरी अशा विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या शाळा व्यवस्थापन समित्यावर असणाऱ्या अध्यक्ष व सदस्यांची आहे. या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष न देता प्रत्येक गावातील पुढाऱ्यांचा या समित्यांमध्ये अवाजवी हस्तक्षेप वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या मूळ उद्देशालाच बगल दिला जात आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे कुणाचेही लक्ष नाही. याउलट शाळेच्या विकासामध्ये हस्तक्षेप करुन मलिदा कसा लाटता येईल, याची जणू तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांत स्पर्धा लागली की काय, अशी स्थिती आहे. प्रत्येक प्राथमिक हायस्कूल शाळेला येणाऱ्या वेगवेगळ्या फंडातून शाळांमध्ये अधिक वर्ग खोल्यांचे बांधकाम वार्षिक डागडुजी सर्व शिक्षा अभियानातून रुपये किंमतीचे स्वच्छतागृह बांधण्यात येते.
या कामात शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य किंवा अध्यक्ष हेच या सर्व कामावर नियंत्रण ठेवतात, अशाअडचणी प्रत्येक शाळांमध्ये आहे. या अडचणी सोडवून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्याचे सोडून पुढारी राजकारणात देशाचे भविष्य ठरविणाऱ्या पिढीचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचे पाप करीत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: School Management Committees began to get involved in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.