शिक्षिकेच्या बदलीसाठी विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार

By Admin | Updated: July 24, 2015 01:03 IST2015-07-24T01:03:26+5:302015-07-24T01:03:26+5:30

मागील सत्रात शिक्षिकीने शिकविले नाही, उत्तर पत्रिका तपासल्या नाही, त्यामुळे निकाल निकालाच्या दिवशी मिळाला नाही.

School boy boycott for teacher transfer | शिक्षिकेच्या बदलीसाठी विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार

शिक्षिकेच्या बदलीसाठी विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार

आंदोलनाचा दुसरा दिवस : शिक्षण विभाग दखल घेईना
वरोरा : मागील सत्रात शिक्षिकीने शिकविले नाही, उत्तर पत्रिका तपासल्या नाही, त्यामुळे निकाल निकालाच्या दिवशी मिळाला नाही. सदर शिक्षिकेची बदली करावी, या मागणीसाठी बुधवारी पालकांनी शाळेवर धडक दिली. आज दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकला.
वरोरा तालुक्यातील भटाळा येथील जिल्हा परिषद विद्यालयात इयत्ता ५ ते ८ वीचे वर्ग असून भटाळा, आसाळा, कोटबाळा आदी गावातील १९० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र शिक्षिकेने मागील सत्रात नियमित तासिका घेतल्या नाही व निकालाच्या दिवशीपर्यंत उत्तरपत्रिका तपासून दिल्या नाही. त्यामुळे हे प्रकरण शेगाव पोलिसापर्यंत गेले होते.
या शिक्षिकेची बदली करण्याकरीता पालकांनी लेखी निवेदन दिले. परंतु शिक्षिकेची बदली झाली नाही.त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी २२ जुलै रोजी शाळेवर धडक देवून शाळेतील आपल्या पाल्यांना बाहेर काढून घेतले. यावेळी पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी के.के. ब्राम्हणकर व गटशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण यांनी भेट देवून संतप्त पालकांशी चर्चा केली व माध्यमिक शिक्षणाधिकारी रमाकांत देशपांडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करुन सदर शिक्षिकेची २५ जुलैपर्यंत बदलीचे आश्वासन दिले. त्यानंतरही जोपर्यंत शिक्षिकेची बदली करणार नाही. तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेत गुरूवारी दुसऱ्या दिवशीही मुलांना शाळेत पाठविले नाही. (तालुका प्रतिनिधी)
मुख्याध्यापक विनापरवानगी रजेवर
जिल्हा परिषद विद्यालय भटाळाचे मुख्याध्यापक टी.ओ. भोयर १३ ते १७ जुलैपर्यंत रजेवर असल्याचा अर्ज शाळेत होता. परंतु शाळेत २२ जुलै रोजी संवर्ग विकास अधिकारी के.के. ब्राम्हणकर व गटशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण यांनी भेट दिली, तेव्हा मुख्याध्यापक उपस्थित नव्हते. रजेवर जातांना वरिष्ठ कार्यालयाला कळविले नाही. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, भेटी दरम्यानच्या दिवशीचा मुख्याध्यापकाच्या रजेचा अर्ज नसल्याने त्या दिवशीचे वेतन कापण्याचे निर्देश बीडीओने दिले असल्याचे सांगितले.

Web Title: School boy boycott for teacher transfer