पोंभुर्णा तालुक्यात रॉकेलची टंचाई
By Admin | Updated: November 1, 2014 22:51 IST2014-11-01T22:51:11+5:302014-11-01T22:51:11+5:30
घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमती आणि अत्यल्प मिळणारे रॉकेल, यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वनविभागातर्फे सरपणासाठी मिळणारे

पोंभुर्णा तालुक्यात रॉकेलची टंचाई
देवाडा खुर्द : घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमती आणि अत्यल्प मिळणारे रॉकेल, यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वनविभागातर्फे सरपणासाठी मिळणारे निस्तार हक्काचे जळावू बिटसुद्धा वेळेवर मिळत नसल्याने परिसरामध्ये इंधनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एका कार्डवर पाच लिटर रॉकेल ऐवजी फक्त २०० ते ३०० ग्रॅम रॉकेल मिळत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
पोंभूर्णा येथे दोन हजार ६४० च्या वर कार्डधारक आहेत. पूर्वी या कार्डधारकांना पाच लिटर रॉकेल मिळायचे; परंतु सद्यस्थितीत कार्डधारकांना दोन ते तीन लिटर रॉकेल मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हिच स्थिती तालुक्यातील ग्रामीण भागात आहे. याबाबत स्थानिक दुकानदारांना विचारणा केली असता, रॉकेलचा पुरवठा कमी होत असल्याने आम्ही जास्तीचे रॉकेल कुठून देणार, असा प्रतिप्रश्न ते उपस्थित करतात. मात्र ग्राहकांचे कमी रॉकेलमध्ये भागत नसल्याने विक्रेत्याकडून ते जास्त रॉकेलची मागणी करीत असतात. यातून दुकानदार व ग्राहकांमध्ये किरकोळ वाद उद्भवत असतात. अशा प्रकारामुळे ग्राहक आणि दुकानदारही त्रस्त होतात.
ग्रामीण परिसरामध्ये घरगुती वापरासाठी इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर रॉकेलचा वापर होतो. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती गगणाला भिडल्याने नागरिकांना रॉकेलवरच अवलंबून राहावे लागते. तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीज असूनसुद्धा विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे अनेक गावांतील वीज रात्रीच्या वेळी खंडीत होत असते. त्यामुळे गावकरी स्वयंपाक तसेच रात्रीच्या प्रकाशासाठी रॉकेलचा उपयोग करतात. मात्र ग्रामीण भागातील रॉकेलचा पुरवठाच नगण्य झाल्याने नागरिक अडचणीत आले आहेत. शासकीय दरानुसार १८ रुपये लिटरप्रमाणे रॉकेलची विक्री केली जात असताना काही दुकानदार अन्य ग्राहकांकडून २५ ते ३० रुपये लिटर घेत असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. अनेक खासगी प्रवासी वाहने व ट्रॅक्टरसारख्या वाहनांमध्ये रॉकेलचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. मग हे रॉकेल वाहन चालक व मालकांना कोठून मिळते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)