साबांवि कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या
By Admin | Updated: May 15, 2015 01:05 IST2015-05-15T01:05:54+5:302015-05-15T01:05:54+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

साबांवि कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या
चंद्रपूर : सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात बांधकाम विभाग क्रांक एकचे कार्यकारी अधिकारी निरंजन तेलंग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (रोहयो) कार्यकारी अधिकारी वामन भावे यांचा समावेश आहे.
निरंजन तेलंग यांचे स्थानांतरण पुणे येथे याच पदावर झाले आहे. त्यांच्या रिक्त पदावर अद्याप कुणाचे नाव आले नसले तरी भंडारा जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता धाबे चंद्रपूरला येण्याची शक्याता वर्तविली जात आहे. अद्याप कुणी अधिकारी न आल्याने निरंजन तेलंग यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एकचे उप विभागीय अभियंता डी. के. लेहगावकर यांच्याकडे या पदाचा प्रभार सोपविला आहे. मागील तीन वर्षांपासून ते बांधकाम विभाग क्रमांक एक मध्ये कार्यरत होते. प्रामाणिक आणि संवेदनशिल अधिकारी अशी त्यांची खात्यामध्ये ओळख आहे.
बांधकाम विभागातील रोहयोचे कार्यकारी अभियंता वामन भावे यांचेही स्थानांतरण अचलपूर येथे झाले आहे. त्यांच्या रिक्त पदावर संगीता जयस्वाल या येत आहेत. भावे यांनी पदभार सोडला असून उपविभागिय अभियंता नेवारे यांच्याकडे तात्पुरता प्रभार सोपविला आहे. येत्या आठवडाभरात नवे अधिकारी रूजू होण्याची शक्यता सुत्रांकडून वर्तविली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
अधिक्षक अभियंत्यांचे पद पाऊणेदोन वर्षांपासून प्रभारी
चंद्रपूरच्या बांधकाम विभागातील अधिक्षक अभियंत्यांचे पद गेल्या पाऊणेदोन वर्षापासून रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांच्या बळावर चंद्रपूर मंडळाचा गाडा हाकला जात आहे. येथील अधिक्षक अभियंता बळवंत लुंगे यांच्या निवृत्तीनंतर जनबंधू यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला होता. तब्बल दिड वर्ष ते या पदावर प्रभारी अधिक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते जिल्हा परिषदेला गेल्यावर त्यांच्या रिक्त पदावर पुन्हा प्रभारी अधिकारीच आले. वर्धा डिव्हिजनचे अधिक्षक अभियंता गायकवाड यांच्याकडे गेल्या तीन महिन्यांपासून या पदाचा प्रभार आला आहे. वर्धा जिल्ह्यातील नियमित कामातून मिळालेला वेळ ते चंद्रपूरला देतात. तब्बल पाऊणेदोन वर्षांंपासून येथे पूर्णवेळ अधिकारी मिळालाच नाही.