त्या वृद्ध महिलेचे वाचविले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:29 IST2021-04-22T04:29:30+5:302021-04-22T04:29:30+5:30
सावरगाव : अन्नपाण्याविना घरात निपचित पडलेल्या एका वृद्धेला तत्काळ मदतीचा हात देत तिला रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. ...

त्या वृद्ध महिलेचे वाचविले प्राण
सावरगाव : अन्नपाण्याविना घरात निपचित पडलेल्या एका वृद्धेला तत्काळ मदतीचा हात देत तिला रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. पाच आशा सेविका व जि.प. सदस्य यासाठी मदतीला धावून आले.
नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील सोनावाटे रस्त्यालगत शेजारीच एका प्रवासी निवाऱ्यात बऱ्याच दिवसांपासून एक वृद्ध दाम्पत्य वास्तव्यास आहे. भीक मागून पोटाची खळगी भरणे हा त्यांचा दैनंदिन उपक्रम. परंतु आता लॉकडाऊन आणि तालुक्यात जनता कर्फ्यू लागल्यामुळे हाॅटेल, दुकाने आदी सर्वकाही बंद असल्याने घरात कोणीही कुणाला प्रवेश देत नसल्यामुळे त्या वृद्ध दाम्पत्यावर उपासमारीची वेळ आली. त्या दाम्पत्यामधली ती वृद्धा अन्नपाण्यावाचून निपचित पडली असल्याचे तळोधी येथील आशा सेविकांना कळले. कोरोनामुळे काही अनर्थ तर घडला नसेल ना, या शंकेमुळे त्या पाच आशासेविका रंजना बोकडे, रविना शेंडे, मंगला अगडे, स्वाती मदनकर आणि वैशाली भेंडाळे ऑक्सिमीटर घेऊन त्या प्रवासी निवाऱ्याच्या दिशेने जात होत्या. तेवढ्यातच गोविंदपूर-तळोधी जिल्हा परिषद क्षेत्राचे जि.प.सदस्य खोजराम मरस्कोल्हे स्वतःच्या चारचाकी वाहनाने तिथून जात होते. अचानक त्यांनी गाडी थांबविली. अशा सेविकांनी त्यांना वृद्धेविषयी माहिती दिली. लागलीच खोजराम मरस्कोल्हे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, तळोधी येथील आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क करून रुग्णवाहिका बोलावून वैद्यकीय उपचारासाठी पाठविले. वेळीच त्या वृद्धेवर उपचार झाल्यामुळे तिचा जीव वाचला.