चंद्रपूर उपविभागात रेती चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
By साईनाथ कुचनकार | Updated: May 9, 2023 17:54 IST2023-05-09T17:53:33+5:302023-05-09T17:54:00+5:30
Chandrapur News मंगळवारी पहाटे वर्धा नदीच्या शिवणी चोर येथून रेती वाहतूक करताना चंद्रपूर तहसीलच्या पथकाने पाच ट्रॅक्टर ताब्यात घेत ट्रॅक्टर मालकांवर दंड आकारला आहे.

चंद्रपूर उपविभागात रेती चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : जिल्ह्यातील रेती घाटातून रेती उत्खनन तसेच वाहतूक करण्यावर बंदी असतानाही काहीजण लपून-छपून रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी करीत आहेत. दरम्यान, मंगळवारी पहाटे वर्धा नदीच्या शिवणी चोर येथून रेती वाहतूक करताना चंद्रपूर तहसीलच्या पथकाने पाच ट्रॅक्टर ताब्यात घेत ट्रॅक्टर मालकांवर दंड आकारला आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. त्यामुळे रेतीची मागणी आहे. ही संधी साधून काही रेती तस्कर मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करीत अव्वाच्या सव्वा दराने विकत आहे. चंद्रपूर येथून जवळच असलेल्या शिवणी चोर येथील वर्धा नदीच्या पात्रातून रेती तस्करी सुरू होती. याबाबत चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी आर मुरुगानंथम यांना माहिती कळताच त्यांनी आपल्या पथकाला नदीपात्रात पाठविले. यावेळी रेती तस्करी करीत असल्याचे नायब तहसीलदार राजू धांडे यांच्या सहकार्यांना आढळून आले.
पथकाने टॅक्टर जप्त केले असून, तहसील कार्यालयात लावले आहे. या कारवाईमध्ये ट्रॅक्टर एमएच ३४ एल ६६१३, एमएच ३४ एल ४४७९, एमएच ३३ व्ही ८४७२, एमएच ३४ एल ६६९२ या टॅक्टरसह एक बिना नंबरचे ट्रॅक्टरही जप्त केले आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी आर मुरुगानंथम यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार राजू धांडे यांच्या नेतृत्वात मंगळ अधिकारी विनोद गणफाडे, विशाल कुरेवार आदींनी केली.