लोकमत न्यूज नेटवर्क ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : तालुक्यातील दिघोरी व गांगलवाडी परिसरातील ७३४ शेतकऱ्यांनी भंडारा ते गडचिरोली या नव्यानेच तयार होणाऱ्या समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास विरोध सुरू केला आहे.
प्रशासनान जमीन मोजणीसाठी नोटिसा बजावल्याने मंगळवारी (दि. २१) उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन 'आधी आमचे म्हणणे जाणून घ्या' असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. भंडारा ते गडचिरोली समृद्धी राज्य महामार्ग मंजूर करण्यात येणार आहे. त्यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित करण्याची तयारी सुरू करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने याबाबत चर्चा न करता संबंधित शेतकऱ्यांना ७/१२, सर्व्हे व गट क्रमांकाची प्रत देऊन मोजणीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. प्रशासनाने चर्चेविना नोटीस दिल्याने शेतकऱ्यांनी समृद्धीसाठी शेतजमिनी देण्यास पुन्हा कसून विरोध सुरू केला आहे.
२७१.४१ हेक्टर जमीन अधिग्रहित करणार दिघोरी व गांगलवाडी परिसरातून एकूण २७१. ४१ हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. त्यामध्ये काही टक्के वनजमिनीचाही समावेश आहे. २५७ हेक्टर सुपीक शेती बाधित हा परिसर भात उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. भाताच्या शेतीसाठी ही जमीन सुपीक मानली जाते. ७३४ शेतकऱ्यांकडून समृद्धी प्रकल्पासाठी २५७ हेक्टर सुपीक जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे.
संतप्त शेतकऱ्यांनी एकत्रित येत उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांना निवेदन दिले. जमीन अधिग्रहणापूर्वी आमचे म्हणणे जाणून न घेता अशा नोटिसा पाठविल्या जात असतील तर हा प्रकल्प कोणत्याही परिस्थिती होऊ देणार नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
"भंडारा ते गडचिरोली समृद्धी महामार्गासाठी जमीन मोजणीसंदर्भातील कार्यवाही प्रशासनाकडून सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांच्या काही मागण्या असल्याने त्यांनी निवेदन सादर केले." - पर्वणी पाटील, उपविभागीय अधिकारी, ब्रह्मपुरी