ंब्रह्मपुरी तालुक्यात खताच्या नावावर मातीची विक्री

By Admin | Updated: August 19, 2015 01:28 IST2015-08-19T01:28:48+5:302015-08-19T01:28:48+5:30

एक वर्षापूर्वी तालुक्यातील चांदली, कालता, नान्होरी, बेलगाव, चांदगाव, बोरगाव, बेलदारी यासह अनेक गावामध्ये बोगस खत कंपनी ...

Sales of soil in the name of fertilizer in Ambramapuri taluka | ंब्रह्मपुरी तालुक्यात खताच्या नावावर मातीची विक्री

ंब्रह्मपुरी तालुक्यात खताच्या नावावर मातीची विक्री

प्रकरण थंडबस्त्यात : ब्रह्मपुरी पोलिसांची कामगिरी संशयाच्या भोवऱ्यात
ब्रह्मपुरी : एक वर्षापूर्वी तालुक्यातील चांदली, कालता, नान्होरी, बेलगाव, चांदगाव, बोरगाव, बेलदारी यासह अनेक गावामध्ये बोगस खत कंपनी व त्यांच्या प्रतिनिधीने शेतकऱ्यांना खताच्या नावावर मातीची विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. यामुळे हजारो शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारीवर पंचायत समिती व कृषी विभागाद्वारे सखोल चौकशी होऊन चौकशीअंती ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात १३ डिसेंबर २०१३ ला गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. मात्र या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आरोपींना केवळ सूचनापत्र देऊन सोडण्यात आले. आता केवळ कागदी घोडे नाचविणे सुरू आहे.
याच प्रकरणातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व न्याय मिळावा म्हणून आमदार नाना श्यामकुळे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विशेष म्हणजे आयुक्तालयातून देखील आरोपीविरुद्ध कारवाई व नुकसान भरपाईबाबतचे आदेश देण्यात आले होते.
एरव्ही सामान्य माणसावर गुन्ह्याची नोंद होताच त्याला तात्काळ अटक करण्यात येते. याही प्रकरणात हीच अपेक्षा होती. पोलिसांनी तक्रारीत नमूद आरोपींना अटक करण्यासाठी २२ सप्टेंबर २०१४ ला अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पथक पाठविले. या पथकाने अमरावती, भिवापूर व ब्रह्मपुरी येथून सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणले. त्यांचे बयाण नोंदविले. त्याबाबतची सविस्तर नोंद स्टेशन डायरीत घेण्यात आली. त्यानंतर त्यांना सुचनापत्र देऊन २४ सप्टेंबर सोडून देण्यात आले. ज्या आरोपींना अटक करण्यात आली होती, त्यात शशीकांत प्रभाकर लाकडे रा. अमरावती, माधव प्रभाकर निमकर किरसा (जि. अमरावती) अशोक पंजाबराव दहीकर गाडगेनगर अमरावती तसेच महेश उर्फ राहूल हरडे यास भिवापूरवरुन तर गिरीश पांडुरंग चालखुरे याला ब्रह्मपुरीतील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. आरोपी दूरवरचे असल्याने पोलिसांनी त्यांना अटक करुन न्यायालयात हजर करणे आवश्यक होते. पण आरोपीना सुचनापत्र देऊन सोडविण्यात आले. यावरुन या प्रकरणातील कारवाईची प्रक्रीया बदलविण्याचा प्रकार पोलिसांकडून करण्यात आल्याचा आरोप आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sales of soil in the name of fertilizer in Ambramapuri taluka