शेतकऱ्यांकडून शासन अनुदानित बैलांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:31 IST2017-12-05T23:30:09+5:302017-12-05T23:31:08+5:30
राजुरा तालुक्यातील लक्कडकोट व कवीठपेठ येथील बैल खरेदीदाराने गावोगावी एजंट नेमून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बैलांची खरेदी सुरू केली आहे.

शेतकऱ्यांकडून शासन अनुदानित बैलांची विक्री
आॅनलाईन लोकमत
राजुरा : राजुरा तालुक्यातील लक्कडकोट व कवीठपेठ येथील बैल खरेदीदाराने गावोगावी एजंट नेमून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बैलांची खरेदी सुरू केली आहे. सध्या नापिकी, कर्ज व वन्यप्राण्यांचा हैदोस, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरीही अनुदानित बैलांची विक्री करीत आहे. याच संधीचा लाभ घेत एजंटांकडून पडत्या दरात बैलांची खरेदी केली जात आहे.
या बैलांची वाहतूक बगलवाही (कोस्टाळा) या आडमार्गाने तेलंगणा राज्यातील गणेशपूर बैल बाजारात केली जाते. शासनाकडून मिळालेल्या अनुदानित बैलाची खरेदी करून नेले जात असताना प्रस्तुत प्रतिनिधीस आढळून आले.
शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन कर्जात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली. यात विविध अटी व शर्ती लादल्यामुळे त्याची शहनिशा व तपासणी करण्यात बराच कालावधी गेला. त्यामुळे शेतकºयांना वेळेवर कर्ज मिळू शकले नाही. नुकतीच प्रथम कर्जमाफीची यादी जाहीर करण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणात तफावत व दोष आढळल्यामुळे शेतकरी लाभापासून वंचित आहे.
यंदा अल्पशा पावसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पेरणी केली. त्यास निसर्गाने साथ दिली नाही. पिकावर विविध प्रकारचे रोग, जमिनीचा ओलावा नष्ट होणे, कमी भाव, उत्पादनात घट, वन्यप्राण्यांचा हैदोस, बँक व खासगी कर्जाचा बोझा यात शेतकरी पिसला जात आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. याच संधीचा लाभ घेण्यासाठी बैल खरेदीदारांनी मोठ्या प्रमाणात चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यातील बैलाची पडत्या दरात खरेदी सुरू केली आहे. रविवारी अशाच प्रकारे काही बैलांची खरेदी करून नक्षलग्रस्त बगलवाही (कोष्टाळा) या अतिदुर्गम पहाडी आडमार्गाने गणेशपूर (तेलंगाणा) बैल बाजारात नेले जात होते. यात शासनाकडून अनुदानात मिळालेला बैलही होता. या बैलाच्या कानाला बिल्ला क्रमांक एम.एल.डी.बी. न्यु इंडिया ३७००१२१९७९२० लावला होता. बैल नेणाऱ्या इसमाजवळ कोणतेच कागदपत्र नव्हते. सदर बैल कवळजी ता. बल्लारपूर येथून आणला असल्याचे त्याने सांगितले.
खरेदीदाराचे एजंट गावोगावी फिरून बैल खरेदी करतात. त्यानंतर कवडजी, आक्सापूर, कवीठपेठ या ठिकाणी डेपोवर बैल गोळा करून बगलवाही (कोष्टाळा) मार्गाने गणेशपूर बाजारात नेले जात आहे. तेथे दररोज शेकडो बैल येतात. हैद्राबाद, आदिलाबाद, करीमनगर येथील मोठे व्यापारी बैलाची खरेदी करून कटाईसाठी ट्रकमध्ये घेऊन जातात. सध्या शेतकरी आर्थिक समस्या सोडविण्यासाठी नाईलाजाने बैल विकत आहे.
यंदा नापिकी, वन्यप्राण्यांचा हैदोस, शेतमालास कमी भाव, फसलेली कर्जमाफी, यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यावर पर्याय म्हणून बैल विकावे लागत आहे.
- भीमराव बंडी, सरपंच व शेतकरी, ग्रा.पं. लक्कडकोट.