विहिरगाव, हरदोना खुर्द येथे रूरल हाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST2021-02-06T04:50:48+5:302021-02-06T04:50:48+5:30
चंद्रपूर : ग्रामीण भागात विक्री व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाकडून जिल्हयात रूरल हाट नावाचा नावीण्यपूर्ण ...

विहिरगाव, हरदोना खुर्द येथे रूरल हाट
चंद्रपूर : ग्रामीण भागात विक्री व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाकडून जिल्हयात रूरल हाट नावाचा नावीण्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. राजुरा तालुक्यातील विहीरगाव व हरदोना खुर्द येथे रूरल हाट सुरू झाले. अगदी पहिल्याच दिवशी ग्राहकांनी विविध वस्तूंची खरेदी करुन स्वयंसहायता समूहांचा उत्साह वाढविला.
बचतगटातील महिला विविध वस्तूंचे उत्पादन करतात. मात्र, त्यांना स्थानिक बाजारपेठ मिळत नाही. ही अडचण लक्षात घेऊन उमेद अभियानातील बचतगटांच्या महिलांनी पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीची परवानगी मिळवून गावातच दैनिक किंवा आठवडी छोटेखानी बाजार सुरू करण्याच्या संकल्पनेने अनेकांना सुविधाजनक झाले आहे. विशेषकरून स्थानिक भाजीपाला उत्पादकांना याचा फायदा होणार आहे. दि. २ फेब्रुवारी रोजी चुनाळ विरूर प्रभागातील विहीरगाव येथील मा जिजाऊ महिला ग्रामसंघाद्वारे रूरल हाटचे उद्घाटन झाले. यावेळी पंचायत समितीचे सभापती मुमताज जावेद, उपसभापती मंगेश गुरनुले, पंचायत समिती सदस्य माणुसमारे, माजी सभापती जेनेकर, सचिव सूर्यवंशी, जिल्हा व्यवस्थापक प्रवीण भांडारकर, तालुका अभियान व्यवस्थापक डोंगरे, तालुका व्यवस्थापक पडवे, भडके, प्रभाग -समन्व्यक अमित भगत, ग्रामसंघ पदाधिकारी व समूहातील सदस्य उपस्थित होते. रूरल हाटमध्ये दहा समूहांतील सदस्यांनी स्वनिर्मित वस्तू विक्रीसाठी ठेवल्या. आर्वी-पाचगाव प्रभागातील हरदोना खुर्द येथील सुरक्षा महिला ग्रामसंघद्वारे रूरल हाट सुरू केले. उद्घाटन उपसभापती गुरनुले यांनी केले. यावेळी सरपंच सूर, सचिव मेश्राम, प्रभाग समन्वयक साईकिरण धोटे, ग्रामसंघ पदाधिकारी व समूह सदस्य उपस्थित होते. १२ समूहांतील सदस्यांनी आपल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या. या संकल्पनेचा इतर तालुक्यांनीही अनुसरण कराव, असे आवाहन मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने यांनी केले आहे.