ग्रामीण भागाचे अर्थचक्र थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST2021-04-21T04:28:00+5:302021-04-21T04:28:00+5:30

: इतर व्यवसायही लॉकडाऊन घनश्याम नवघडे नागभीड : मिरची नागभीड तालुक्यातील पीक नसेना का, पण याच मिरचीने या तालुक्यातील ...

The rural economy stopped | ग्रामीण भागाचे अर्थचक्र थांबले

ग्रामीण भागाचे अर्थचक्र थांबले

: इतर व्यवसायही लॉकडाऊन

घनश्याम नवघडे

नागभीड : मिरची नागभीड तालुक्यातील पीक नसेना का, पण याच मिरचीने या तालुक्यातील हजारो हातांना रोजगार उपलब्ध करुन दिला आणि तालुक्यातील अर्थचक्राला गती मिळाली. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूमध्ये हे मिरची सातरे रडारवर आल्याने बंद करण्यात आले आहेत. परिणामी तालुक्याच्या ग्रामीण भागात मिरची सातऱ्यांच्या रूपाने सुरू असलेले अर्थचक्र थांबले आहे.

नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धान आहे. धान या एका पिकावरच तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. पण दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे या तालुक्यातील धान शेती भकास होत चालली आहे. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी या धोरणाने शेतकरीही हतबल झाले आहेत. उद्योगाच्या बाबतीत तर नागभीड तालुका कोसोदूर आहे. उद्योगविरहीत तालुका अशीच नागभीड तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे येथील तरुणांना आणि लोकांना शेतीची कामे संपली की, बेकारीचेच जीवन जगावे लागते. म्हणूनच तालुक्यातील हजारो मजूर कामाच्या शोधात जिल्ह्यात आणि दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर करीत होते. अशा परिस्थितीत नागभीड तालुक्यातील किमान ४० ते ५० गावात सुरु करण्यात आलेले मिरचीचे सातरे त्या परिसरातील मजुरांना दिलासा देणारे ठरले होते.

हे मिरची सातरे पाहून अनेकांना समज होत होता की, ही मिरची एक तर भिवापूर येथून किंवा नागपूर जिल्ह्यातून येत असावी. पण हा समज पूर्णत: चुकीचा होता. या सातऱ्यावर येणारी मिरची आंध्रप्रदेशातून ट्रकांद्वारे आणली जात होती. तिथे मिरचीच्या मुक्या काढल्या जात होत्या. त्यासाठी एका बोरीवर मजुरांना ठराविक मोबदला दिला जात होता. एक जोडी दीड दिवसात एक बोरा मिरचीच्या मुक्या काढण्याचे काम करीत होती. आता हे सातरे गावातच असल्याने या मजुरांनी मुलांनाही या कामावर लावून घेतले होते. मिरची स्वच्छ झाली की, देशविदेशात निर्यात होत होती.

बॉक्स

रोजगार हमीची कामेही बंद

शासनाने मग्रारोहयोच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचे कबूल केले असले तरी शासनाचे हे आश्वासन अभावानेच नागभीड तालुक्यात दिसून येते.

नागभीड तालुक्यात अगदी बोटावर मोजण्याइतके रोजगार हमी योजनेचे काम सुरू आहेत. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही.

बॉक्स

जिथे मजूर तिथे सातरा

या मिरची सातऱ्यांचे एकंदर अवलोकन केले तर ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध होतात, त्या ठिकाणी हे मिरची सातरे सुरू करण्यात येतात. एका सातऱ्यावर किमान २०० ते ३०० मजूर काम करतात. काही गावात तर मजुरांची उपलब्धता लक्षात घेऊन दोन सातरे सुरू करण्यात आले होते. नागभीड तालुक्यात किमान ५० गावात मिरची सातरे असावेत. याचा अर्थ किमान १० हजार मजुरांची रोजी रोटी या मिरची सातऱ्यांवर अवलंबून होती. मात्र, लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यूने या रोजीरोटीवरच गदा आली आहे.

बॉक्स

ग्रामपंचायतीकडे नोंद

या मिरची सातऱ्यांची नोंद तहसील कार्यालयाकडे करण्यात येत नाही. ती ग्रामपंचायतींकडे असते, अशी माहिती तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. त्यामुळे तालुक्यात नेमके किती सातरे आहेत, हे सांगता येणार नाही, असे ते म्हणाले.

Web Title: The rural economy stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.