पोंभुर्ण्यातील गोणपाट व्यवसाय संकटात
By Admin | Updated: April 27, 2015 00:59 IST2015-04-27T00:59:59+5:302015-04-27T00:59:59+5:30
पोंभुर्णा परिसरात धान पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. धान पीक घेऊन ते घरी आणण्यासाठी बैलबंडीवर गोणपाटाचा वापर केला जातो.

पोंभुर्ण्यातील गोणपाट व्यवसाय संकटात
पोंभुर्णा : पोंभुर्णा परिसरात धान पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. धान पीक घेऊन ते घरी आणण्यासाठी बैलबंडीवर गोणपाटाचा वापर केला जातो. पण आता शेतकऱ्यांनी बैलबंडीने धान चुरणे बंद केले असून आता थेट ते क्रेशरने चुरुन धान पोत्यात भरुन ट्रॅक्टरने व्यापाऱ्याकडे विकले जाते. यामुळे पोंभुर्णा येथील गोणपाट व्यवसाय संकटात आला आहे.
पोंभुर्णा शहरालाच स्वातंत्र्यपूर्व काळात विशेष महत्त्व होते. इंग्रज याच शहरातून शेतसारा घेत होते. त्यासाठी त्यांनी सावकाराच्या मदतीने मोठमोठे कोठारे बांधली होती. तिथेच शेतसारा जमा व्हायचा. पण नेण्याचे कोणतेही साधन नसल्याने इंग्रजांनी गोणपाटाचा वापर केला . नंतर याच गोणपाटाची खूप मागणी वाढली. पण काळ बदलला आणि गोणपाट व्यवसायाला अखेरची घरघर लागली. पूर्वी विदर्भातील दलित समाज विणकाम करीत असे. खादी, धोतर, लुगडी व इतर प्रकारचे कापड बनवित होते. त्यात त्यांना थोडे पैसे मिळायचे. पण एक वर्षी फार मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे पोंभूर्णा येथील दलित समाजाचे काही लोक वणी येथे कामासाठी गेले. मातीकामातून त्यांना धान्य मिळाले ते धान्य पोंभुर्णा येथे आणण्यासाठी सावकाराने त्यांना गोणपाट दिला आणि तोच गोणपाट हजारो लोकांना रोजगार देऊ लागला. त्या काळी पुणाजी वनकर, गोविंदा भसारकर, धोंडूजी वाळके यांना ही कला येत होती. मग हळूहळू ही कला गावातील अनेक लोकांनी शिकायला सुरूवात केली व या व्यवसायाला जीवन जगण्याचे साधन केले. दिवस बदलत गेले, काळही बदलला. या व्यवसायावर ज्यांनी आपले संसाराचे रहाटगाडगे चालविले, असे काही जणच आता आपला व्यवसाय टिकवून आहे.
गोणपाट बनविण्याची प्रक्रिया अवघड असल्याने याकडे युवकांचे दुर्लक्ष होत आहे. जुने जाणकार सांगतात, नागपुरातून सुत खरेदी करायची. नंतर ते सुत घेऊन पोंभुर्णा येथे आणायचे. सुताची पेटी खोलून त्यातील ‘मुढी’ उकलायची. नंतर सुताला सुत जोडून त्याला ‘पाजन’ करुन उन्हात सुखवायचे. त्यानंतर ते विनकरीसाठी तयार होत असे. विनकाम झाल्यावर त्याला शिवून विक्रीसाठी आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, विदर्भ येथे नेऊन विकल्या जात असे. पूर्वी बँका गोणपाटावर कर्ज देत होत्या. पण आता बँकांनी कर्ज देणे बंद केले आहे. त्यामुळे विणकरही मोठ्या संटात सापडला आहे. शासनाने हातमाग कामगारांसाठी विविध योजना व त्यांच्यासाठी वेगवेगळे पॅकेज दिले आहे. पण या पॅकेजचा लाभ पोंभूर्णा येथील गोणपाट विनकरांना होत नसल्याचे दिसून येत आहे. लघु उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाने खादी ग्रामोद्योग महामंडळ स्थापन करण्यात आले. पण याचा कोणताही लाभ या विणकरांना होत नाही. शासनाने या सर्व विनकरांची नोंदणी करून त्या सर्व विणकरांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. (शहर प्रतिनिधी)