ड्रायव्हिंग स्कूल संचालकावर आरटीओ अधिकारी मेहरबान
By Admin | Updated: January 21, 2016 01:03 IST2016-01-21T01:03:43+5:302016-01-21T01:03:43+5:30
येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे ब्रह्मपुरी येथे आयोजित परवाना वाटप शिबारात शिबिरार्थींचे कागदपत्र घेऊन ड्रायव्हिंग स्कूलचा संचालक पसार झाला.

ड्रायव्हिंग स्कूल संचालकावर आरटीओ अधिकारी मेहरबान
आरटीओ विभागाचा भोंगळ कारभार : कागदपत्रांसह पसार होऊनही तक्रार नाही
चंद्रपूर : येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे ब्रह्मपुरी येथे आयोजित परवाना वाटप शिबारात शिबिरार्थींचे कागदपत्र घेऊन ड्रायव्हिंग स्कूलचा संचालक पसार झाला. मात्र या प्रकरणाची साधी तक्रारही आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली नाही. उलट ज्यांनी हे प्रकरण उजेडात आणले, त्यांचे कागदपत्र मिळविण्यासाठी आपला कार्यालयीन कर्मचारी नागपूरच्या ड्रायव्हिंग स्कूल संचालकाकडे पाठवून कागदपत्रे मिळविले. त्यामुळे ड्रायव्हिंग स्कूल संचालकावर आरटीओ विभागाचे अधिकारी एवढे मेहरबान का, असा प्रश्न प्रा. राजेश गजपुरे यांनी केला आहे.
११ मे २०१५ रोजी ब्रह्मपुरीत आरटीओ विभागाचा कॅम्प झाला. यात अनेकांची वाहन चालविण्याची चाचणी झाली आणि अनेक जण उत्तीर्ण झाले. या उत्तीर्ण शिबिरार्थीचे कागदपत्र परवान्यासाठी आरटीओ कार्यालयात सादर होणे आवश्यक होते. ही जबाबदारी त्या कॅम्पच्या प्रमुखाची होती. मात्र उत्तीर्ण झालेल्यांची कागदपत्रे कार्यालयात पोहोचलेच नाही. त्यामुळे संबधीतांचे परवाने सहा महिन्यांपासून अडले.
याबाबत शिबिर प्रमुख म्हणून त्यावेळी उपस्थित असलेले मोटार वाहन निरीक्षक व सहायक शिबिर प्रमुख यांना कल्पना होती की नाही, हे अद्याप निश्चीत नाही. मात्र ज्यांचे परवाने अडले त्यांनी चौकशीसाठी आरटीओ कार्यालय गाठले असता, शिबिर प्रमुखांनी कागदपत्रांची चौकशी सुरू केली. तेव्हा नागपूर येथील ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकाला भ्रमणध्वनीद्वारे विचारणा करण्यात आली. त्याने संबधीत नागरिक चाचणीत अनुउत्तीर्ण झाल्याचे सांगितले.
यावरून असे दिसून येते की, ते अनुउत्तीर्ण की उत्तीर्ण याची माहिती सहा महिन्यानंतरही ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकास कसे लक्षात राहिले. याचवेळी आरटीओ कार्यालयाचे अधिकारी बोलत असल्याचे त्याला सांगताच, आपल्याकडेच कागदपत्रे असल्याचे स्कूलच्या संचालकाने सांगितले.
तेव्हा चंद्रपूर आरटीओ कार्यालयातील एक कर्मचारी नागपूरला कामानिमीत्त्य गेला होता. तेव्हा त्यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देऊन ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकाकडे पाठविण्यात आले. त्यांनी संचालकाकडून तक्रारकर्त्यांचे कागदपत्र ताब्यात घेऊन एका कार्यालयीन अधिकाऱ्याच्या मोबाईलवर व्हॉट्स अॅपद्वारे फोटो पाठविले व तेच कागदपत्र असल्याची खात्री करून घेतली.
मात्र हे सर्व करताना विनापरवानगीने शिबिरार्थीचे कागदपत्र ड्रायव्हिंग स्कूल संचालकाकडे गेले कसे आणि त्याच्याकडे कागदपत्र गेले असल्याचे लक्षात आल्यानंतरही आरटीओ विभागाने त्याची तक्रार का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात मोठा गैरव्यहार झाला असल्याचा आरोप ब्रह्मपुरीचे प्रा. राजेश गजपूरे यांनी केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)