निधीअभावी रस्त्याचे बांधकाम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST2021-02-05T07:42:51+5:302021-02-05T07:42:51+5:30

जिवती : परिसरातील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही ग्रामपंचायतींना बांधकामाचा निधी न मिळाल्याने ...

Road construction stalled due to lack of funds | निधीअभावी रस्त्याचे बांधकाम रखडले

निधीअभावी रस्त्याचे बांधकाम रखडले

जिवती : परिसरातील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही ग्रामपंचायतींना बांधकामाचा निधी न मिळाल्याने कामे थांबविल्याचे दिसून येते. पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदकडे अहवाल पाठवून निधीची तरतूद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रवासी निवाऱ्याअभावी प्रवाशांचे हाल

भद्रावती : तालुक्यातील काही गावांमध्ये निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. राज्य परिवहन मंडळाने गावागावात पाहणी करून निवारा शेड उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी केली जात आहे.

स्वच्छता मोहीम राबवावी

ब्रह्मपुरी : मागील काही महिन्यापासून स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतने स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा

चंद्रपूर : रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्री दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले. स्थानिक प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.

महागाईमुळे सामान्य ग्राहक त्रस्त

चंद्रपूर : मागील काही महिन्यामध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच महागाईमुळे जगण्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महागाई कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

घुग्घुस तालुका निर्मितीचा प्रश्न प्रलंबित

घुग्घुस : जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असलेल्या घुग्घुस शहराला तहसीलच्या दर्जा देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. घुग्घुस हे औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. चंद्रपूर तालुक्याचा वाढता कारभार बघता स्वतंत्र तालुक्याची निर्मिती करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

धूळ प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त

माजरी : कोळसा उद्योगामुळे माजरी शहर सर्वदूर परिचित आहे. मात्र या कोळसा खाणीच्या होणाऱ्या वाहतुकीमुळे शहरात धूळ प्रदूषण वाढले आहे. बऱ्याच वाहनावर ताडपत्री झाकून राहत नसल्याने कोळसा रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

देऊरवाडा येथील तीर्थक्षेत्राचा विकास करावा

भद्रावती : तालुक्यातील देऊरवाडा येथे अनेक धार्मिक ठिकाण आहेत. त्यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन येथील पायाभूत विकास घडवून आणावा, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी सुविधा पुरविण्यात आल्यास येथील पर्यटन विकास साधला जाईल.

चिमूर- नंदोरी मार्गावर बसफेऱ्या वाढवा

खडसंगी : चिमूर येथून कोरा मार्गे नंदोरीसाठी बसफेऱ्या वाढविण्यात याव्या, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. या मार्गावर अत्यल्प बसेस असल्याने प्रवाशांना तासन्‌तास ताटकळत राहावे लागते. याचा फटका सर्वसामान्य येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना बसतो आहे.

गोंडपिपरी-गडचांदूर बससेवा सुरू करा

गोंडपिंपरी : येथून तोहोगावमार्गे गडचांदूरसाठी थेट बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या बससेवेमुळे कमी अंतरात व आर्थिक बचतीत प्रवाशांना प्रवास करता येईल. याचा लाभ गोंडपिपरी व राजुरा तालुक्यातील नागरिकांना होईल.

जंगलव्याप्त परिसरात फिरणे टाळा

सिंदेवाही : पहाटेच्या सुमारास फिरायला गेलेले अनेक जण वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले असल्याच्या घटना घडत आहेत. त्या टाळण्यासाठी जंगलव्याप्त परिसरात अंधाराच्या वेळेस फिरायला जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

जागेचे पट्टे देण्याची मागणी

चंद्रपूर : शहरातील बहुतांश भाग हा नझूलच्या जागेवर वसला आहे. जवळपास ६० हजार घरे नझूलच्या जागेवर आहेत. लाखो रुपयाचे घर असूनही पट्टे नसल्यामुळे येथील नागरिकांना विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. घरकुल योजनेंतर्गत अनेकांचे अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र घराला पट्टा नसल्याने घराचे स्वप्न लांबले आहे.

धूर फवारणी करण्याची मागणी

चंद्रपूर : शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. महापालिका प्रशासनाने डासांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, काही मोकळ्या भूखंडावर आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे याचाही धोका नागरिकांना आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

शौचालय असतानाही नागरिक उघड्यावरच

चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शासनाने वैयक्तिक शौचालये बांधून दिली आहेत. असे असतानाही आजही काही नागरिक शौचालयाचा वापर न करता बाहेर जात असल्याने ग्रामीण भागातील स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहे. प्रशासनाने जिल्हा हागणदारीमुक्त असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करून या नागरिकांना शौचालयात जाण्याची सवय लावणे गरजेचे आहे.

अनावश्यक सेवांनी मोबाईलधारक त्रस्त

खांबाडा : मोबाईलचा वापर सर्वत्र वाढला आहे. पण कंपन्यांकडून अनावश्यक सेवांचा भडीमार ग्राहकांवर होत आहे. यामुळे मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत. तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे.

वीजखांबामुळे अपघाताचा धोका

चंद्रपूर : शहरातील सिव्हिल लाईन तसेच रामनगर चौकामध्ये रस्त्याच्या मधोमध वीजखांब आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय परिसरातील रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. मात्र वीजखांब काढण्यात न आल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे वीजखांब हटविण्याची मागणी केली जात आहे.

सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या

चंद्रपूर : कोरपना व गडचांदूर येथे मार्केट यार्डमध्ये शेतकरी मोठ्या संख्येने धान्य विक्री तसेच जनावरे खरेदी-विक्रीसाठी येतात. मात्र या ठिकाणी शेतकरी व जनावरांची प्रचंड गैरसोय होत आहे. कोरपना येथे दर शुक्रवारी तर गडचांदूर येथे मंगळवारी आठवडी बाजार भरतो. परिसरातील शेतकरी आपली जनावरे विक्रीसाठी आणतात.

आधारकार्डसाठी नागरिकांची गर्दी

चंद्रपूर : ग्रामीण भागातील काही गावातील नागरिकांकडे अद्यापही आधारकार्ड नसल्याने नागरिक आधारकार्ड काढण्यासाठी शहरात येत आहेत. ग्रामीण भागात शेतमजुरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आधारकार्डची गरज असते. त्यामुळे आधारकार्ड नोंदणी केंद्र शोधताना सध्या नागरिक दिसत आहेत. त्यामुळे आधारकॉर्ड काढणारी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हिमायतनगर ते बुद्धगुडा रस्त्याची मागणी

जिवती : तालुक्यातील बुद्धगुडा हे गाव अनेक समस्येने ग्रासले आहे. या गावात अजूनही योग्य रस्ते नाही. त्यामुळे गावातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हिमायतनगर ते बुद्धगुडा हा रस्ता तयार करण्याची मागणी बुद्धगुडा गावातील नागरिकांनी केली आहे.

तेलवासा-भद्रावती रस्त्याची दुरवस्था

भद्रावती : भद्रावती तालुक्यातील तेलवासा ते सुमठाणा हा रस्ता आयुध निर्माणी चांदा यांच्या अखत्यारित येतो. मात्र सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ब्रह्मपुरी-वडसा बायपास रोडची मागणी

ब्रह्मपुरी : शहरातील वर्दळ लक्षात घेता अपघाताला निमंत्रण देण्यापूर्वी ब्रह्मपुरी- वडसा रोडवर बायपास रोड ताबडतोब निर्माण करण्यात यावा, अशी मागणी ब्रह्मपुरी सिटीझन्स फोरम व ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या तिमाही सभेत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुभाष बजाज होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Web Title: Road construction stalled due to lack of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.