नदी, नाले कोरडे; पाण्यासाठी गावागावात हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 23:00 IST2018-05-24T23:00:17+5:302018-05-24T23:00:35+5:30
जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईने बेजार स्थिती निर्माण झाली आहे. राजुरा तालुका आणि परिसर सुद्धा या परिस्थितीला अपवाद नाही. तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांची चांगलीच फजिती होत आहे.

नदी, नाले कोरडे; पाण्यासाठी गावागावात हाहाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईने बेजार स्थिती निर्माण झाली आहे. राजुरा तालुका आणि परिसर सुद्धा या परिस्थितीला अपवाद नाही. तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांची चांगलीच फजिती होत आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. वर्धा नदीचे पात्र सध्या एक मोठे वाळवंट बनले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील वर्धा नदीचे पात्र, नद्या, नाले, तलाव, विहिरी शेवटच्या घटका मोजत आहेत. नद्या, नाले यावर बॅरेज बांधकाम झालेले नाहीत. अनेक बंधारे, मोडकळीस आलेले आहेत. बांध नाजूक स्थितीत आहेत. त्यामुळे राजुरा शहरालाही पाणीसाठी झगडावे लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिक पाण्यासाठी टाहो फोडत असून प्रशासन मात्र हतबल झाले आहे.
माध्यमातून समस्या मांडली तर प्रशासन काही तुरळक उपाय करते. मात्र टॅकरच्या साह्याने पाणी पुरवठा करण्याचे प्रयत्नही तोकडे पडत आहेत. परिणामी पाण्यासाठी नागरिकांना चांगलाच संघर्ष करावा लागत आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातील पाचगाव, सोनुर्ली, लखमापूर, बिबी, नांदा, कोठोडा, धामणगाव, नैतामगुडा, आसर (बु.) खिर्डी, वडगाव, चनई, मांगलहिरा, कोरपना, गडचांदूर, हरदोना, वनसडी, पिपर्डा, कोडसी, सास्ती, धोपटाळा, रामपूर, साखरी, मात्रा, कन्हाळगाव, पिट्टीगुडा, भूरी येसापूर, अंतापूर, पद्मावती, इंदिरानगर, पाटागुडा, कुंभेझरी, घनपठार यासारख्या अनेक गावांमध्ये नागरिक पाण्यासाठी वनवन भटकत आहेत.
जिवती, कोरपना तालुक्यात तर खड्डे खोदून त्यातील पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. हातपंपाला पाणी नसल्याने त्यात पाणी जमा होण्याची वाट पाहत गावकरी रात्रभर जागे असतात. पाणी साचले की मध्यरात्री उठून पाणी भरतात. एवढी भीषण परिस्थिती असतानाही प्रशासन मात्र अनेक ठिकाणी हातावर हात धरून बसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तर काही भागात प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र तेही अपुरे पडताना दिसत आहे. अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे. असेच राहिल्यास पाण्यासाठी सुरू असलेल्या संघर्ष एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने आपल्या आराखड्यात विहीरीचे खोलीकरण, इनवेल बोअर मारणे, खाजगी विहीरी अधिग्रहण करणे, नवीन विहिरी, कूपनलिका लावणे, तात्पुरत्या पुरक योजना निर्माण करणे असे निश्चित केले. मात्र एकही उपाययोजना झालेल्या नाही.
प्रभावी उपाय हवे
जिल्ह्यात सध्या सूर्य आग ओकत असून जागतिक तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. जमीनीतील ओलावा केव्हाच नष्ट झाला असून जंगले, माळरान ओसाड पडत आहेत. यासोबतच मामा तलावातही अत्यल्प पाणी शिल्लक आहे. यामुळे गावखेड्यात पाण्याचे स्रोत झपाट्याने आटत चालले आहेत. मान्सून वेळेवर न आल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.