वीज खांबामुळे अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:20 IST2021-01-01T04:20:21+5:302021-01-01T04:20:21+5:30
सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात चंद्रपूर : कोरपना व गडचांदूर येथे मार्केट यार्डमध्ये शेतकरी मोठ्या संख्येने धान्य विक्री तसेच जनावरे ...

वीज खांबामुळे अपघाताचा धोका
सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात
चंद्रपूर : कोरपना व गडचांदूर येथे मार्केट यार्डमध्ये शेतकरी मोठ्या संख्येने धान्य विक्री तसेच जनावरे खरेदी-विक्रीसाठी येतात. मात्र या ठिकाणी शेतकरी व जनावरांची प्रचंड गैरसोय होत आहे. कोरपना येथे दर शुक्रवारी तर गडचांदूर येथे मंगळवारी आठवडी बाजार भरतो. परिसरातील शेतकरी आपली जनावरे विक्रीसाठी आणतात.
आधार कार्डसाठी केंद्रावर गर्दी वाढली
चंद्रपूर : ग्रामीण भागातील काही गावांतील नागरिकांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याने नागरिक आधार कार्ड काढण्यासाठी शहरात येत आहेत. ग्रामीण भागात शेतमजुरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आधार कार्डची गरज असते. त्यामुळे आधार कार्ड नोंदणी केंद्र शोधताना सध्या नागरिक दिसत आहे. त्यामुळे गावागावात आधार कर्ड केंद्र सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरात हायमास्ट दिवे लावण्याची मागणी
चिमूर : चिमूर-कान्पा या मुख्य मार्गावरून जड वाहतुकीसोबतच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याच मार्गालगत मिलन लॉनपर्यंत दुभाजक आहे. मात्र दुभाजकाच्या शेवटच्या टोकावर विद्युत पथदिवा नसल्याने अंधार पडलेला असतो. त्यामुळे परिसरात अपघात झाले आहेत. मात्र नगर परिषद व बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हायमास्ट लावून चौकात गतिरोधक तयार करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली.
कोरपना-वणी
बसफेऱ्या वाढवा
कोरपना : कोरपना व वणी येथून सायंकाळी ६ वाजतानंतर बसफेरी नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. वणी या परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. दररोज शेकडो नागरिक ये-जा करतात. मार्गावरील लालगुडा, वाघदरा, मंदर, केसुर्ली, चारगाव चौकी, शिरपूर, कुरई, आबई, वेळाबाई, ढाकोरी बोरी, मूर्ती गावातील नागरिकांना हीच शेवटची बस आहे. त्यामुळे दूर अंतरावरून येणाऱ्यांना वणीला मुक्कामी राहिल्याशिवाय पर्याय नाही.
पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्याची मागणी
गोंडपिपरी : तालुक्यातील विविध गावात पाण्याच्या टाक्या आहेत. पण शोभेच्या वास्तू ठरल्या. पाणीपुरवठा योजना मंजूर असतानाही पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत. यंदा पावसाचे प्रमाण कमी होते. परिणामी, विहिरींची पातळी खालावली. हातपंपालाही पाणी नाही. संबंधित विभागाने लक्ष देऊन पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारक त्रस्त
भद्रावती : भद्रावती तालुक्यातील तेलवासा ते सुमठाना हा रस्ता आयुध निर्माणी चांदाच्या अखत्यारित येतो. मात्र सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी नागरिकांनी अनेकवेळा निवेदन दिले आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली
चंद्रपूर : शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. यामुळे अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था योग्य ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
जिवती : जंगलव्याप्त क्षेत्रात वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या हंगामाचे दिवस असल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना तारेचे कुंपण तसेच अन्य योजना सुरू कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
रस्त्यावरील रेतीमुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : शहरातील बहुतांश रस्त्यावर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे. दुचाकी वाहने स्लिप होऊन अनेकांचे अपघातही झाले आहेत.
कचरा तुंबल्याने आरोग्य धोक्यात
चंद्रपूर : शहरातील काही नाल्यांमध्ये कचरा तुंबल्यामुळे या नाल्यांचे पाणी रस्त्यांवर येत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वाॅर्डनिहाय नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.
बीपीएल यादीचे सर्वेक्षण करावे
चंद्रपूर : गोरगरिबांना धान्य योजनेचा लाभ मिळावा, यासाठी बीपीएल धारकांची यादी करण्यात आली आहे. मात्र या यादीत गोरगरिबांऐवजी सधन कुटुंबांचीच नावे समाविष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक योजना कागदोपत्रीच असल्याने गरजू नागरिकांना विकासापासून वंचित राहावे लागत आहे.