जादुटोण्याच्या संशयावरुन हत्येचे प्रमाण वाढले
By Admin | Updated: October 29, 2014 22:47 IST2014-10-29T22:47:16+5:302014-10-29T22:47:16+5:30
विज्ञानाचे युगात वावरतांना मोबाईल, फोनसारख्या विविध तंत्रज्ञानाचा गावखेड्यातील लोकही वापर करतात. मात्र, सोळाव्या शतकातील भूत, करणी, जादुटोणा यासारख्या अस्तित्वहिन

जादुटोण्याच्या संशयावरुन हत्येचे प्रमाण वाढले
सिंदेवाही : विज्ञानाचे युगात वावरतांना मोबाईल, फोनसारख्या विविध तंत्रज्ञानाचा गावखेड्यातील लोकही वापर करतात. मात्र, सोळाव्या शतकातील भूत, करणी, जादुटोणा यासारख्या अस्तित्वहिन गोष्टींवर विश्वास ठेवतात. चंद्रपूर जिल्ह्यात अंधश्रद्धेपोटी हत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
जुलै महिन्यात बल्लारपूरजवळ जादुटोण्याच्या संशयातून शंकर हरी पिंपळकर या इसमाचा अंधश्रद्धा जमावाने हत्या केली. १६ आॅक्टोबरला कोरपना तालुक्यातील लखमापूर येथे भूत उतरविण्याच्या नावाखाली काकानेच पुतण्याचा बळी घेतला आणि आता सिंदेवाही तालुक्यातील सावरगाटा येथे जादुटोणा केल्याच्या संशयापायी दिवाळीच्या दिवशी राजेंद्र ठाकरे नावाच्या युवकाचा खून करण्यात आला.
यासंदर्भात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी म्हटले आहे, ‘जादुटोण्याने माणसं मारता आली असती तर शासनाने सैन्यात मांत्रीकाची भरती केली नसती का? एवढा साधा तर्क गेली अनेक वर्षापासून आम्ही लोकांना समजावून सांगत आहोत. एवढचं नाही तर मंत्राने भाजला पापड जरी मोडून दाखविला तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती २१ लाख रुपयाचे बक्षीस देते. पण या प्रबोधनापेक्षा त्यांच्यावर अंधश्रद्धांचा पगडा कायम रहावा यासाठी सतत सुरू असलेल्या कार्यक्रमांचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे आजही अंधश्रद्धेपोटी होणाऱ्या खुनांचे प्रमाण वाढत आहे. ज्या परिसरात या घटना घडतात तेथील स्थानिक सुशिक्षित अजूनही अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यायला उत्सुक नाहीत ही शोकांतिका आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र शासनाने २६ आॅगस्ट २०१३ पासून ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम’ लागू केला आहे. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यास कमीत कमी सहा महिने कारावास आणि पाच हजार रुपये दंड ते सात वर्षे कारावास आणि ५० हजार रुपयापर्यंत दंड असे शिक्षेचे स्वरूप असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या व्यक्तींवर जादुटोण्याचा संशय घेतला जातो अशा व्यक्तींनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी किंवा अंनिसच्या कोणत्याही शाखेला लेखी कळवावे, असे आवाहन विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)