रिलायन्स जीओवरून आमसभेत गदारोळ
By Admin | Updated: August 1, 2014 00:11 IST2014-08-01T00:11:57+5:302014-08-01T00:11:57+5:30
रिलायन्स जीओचे खोदकाम व टॉवर्स उभारणीच्या प्रकरणावरून आज गुरुवारी महापालिकेच्या आमसभेत पुन्हा गदारोळ झाला. अखेर याबाबत मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली.

रिलायन्स जीओवरून आमसभेत गदारोळ
सत्ताधाऱ्यांचा पुन्हा विरोध : मतदान नाकारल्याने नगरसेवकांनी सभेतून केले बहिर्गमन
चंद्रपूर : रिलायन्स जीओचे खोदकाम व टॉवर्स उभारणीच्या प्रकरणावरून आज गुरुवारी महापालिकेच्या आमसभेत पुन्हा गदारोळ झाला. अखेर याबाबत मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली. मात्र मनपा पदाधिकाऱ्यांनी यास नकार दिल्याने बहुसंख्य नगरसेवकांनी सभेतूनच बहीर्गमन केले.
रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. कंपनीचे भूमिगत खोदकाम व टॉवर्स उभारणीचे प्रकरण अद्यापही सुटू शकले नाही. मनपा पदाधिकारी याबाबत सकारात्मक दृष्टीकोन बाळगून आहेत तर सत्ताधारी काँग्रेस व भाजपाच्या नगरसेवकांनी याला विरोध दर्शविला आहे. आज महापालिकेच्या सभागृहात आमसभा आयोजित करण्यात आली होती. या आमसभेत विषय क्रमांक ४२ अन्वये पुन्हा हाच विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. यापूर्वीच्या ३० जूनच्या आमसभेतही रिलायन्स जीओला खोदकाम करणे व टॉवर्स उभारणे यासाठी ५० ते ५५ नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता. मात्र प्रोसेडींगमध्ये केवळ काँग्रेसच्या सहा व भाजपाच्या १५ सदस्यांची नावे टाकली.
याशिवाय या सभेत सदर विषयावर सभागृहात जी चर्चा झाली तीदेखील प्रोसेडींगमध्ये चुकीची लिहिण्यात आली, यावर काँग्रेस व मित्रपक्षांच्या नगरसेवकांनी यावेळी आक्षेप घेतला. जोपर्यंत सुप्रिम कोर्टाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत रिलायन्स जीओचे काम बंद करण्यात यावे, अशी मागणी करीत आयुक्तांनी केबल टाकणे व टॉवर्स उभारणे या दोन्ही कामांना स्थगिती दिल्यानंतरही भूमिगत केबलींगचे काम कसे सुरू आहे, याचा जाब विचारत नगरसेवकांनी एकच गदारोळ केला. शहरामध्ये टॉवर्स उभारावे की नाही, याबाबत मतदान प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी सभेत तब्बल ४५ मिनिटे रेटून धरण्यात आली. या मतदान प्रक्रियेद्वारे जनतेला कळू द्या की कोण टॉवर्स उभारणीच्या बाजुला आहे व कोण नाही, असेही बजावण्यात आले. मात्र महापौर व उपमहापौर यांनी ही मागणी मान्य केली नाही. मतदान घेणार नाही, असे सांगितल्याने अनेक नगरसेवकांनी बहिर्गमन केले. यात प्रशांत दानव, प्रविण पडवेकर, अनिता कथडे, सुनिता अग्रवाल, शिल्पा आंबेकर, उषा धांडे, विणा खनके, कश्यप, सकिना अंसारी आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)