मत्स्य व्यावसायिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:40 IST2017-07-19T00:40:23+5:302017-07-19T00:40:23+5:30
जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यात यावेत, असे आदेश सोमवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

मत्स्य व्यावसायिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा
सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश : मुंबईत पार पडली बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यात यावेत, असे आदेश सोमवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
सह्याद्री अतिथीगृहात सोमवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, चंद्रपूर जिल्हा मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष चंद्रलाल मेश्राम यांच्यासह मत्स्य व्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचा एक उत्तम पॅटर्न तयार करण्यात यावा, असे सांगून एक महिन्याच्या आत यासंबंधीचा डीपीआर तयार करण्यात यावा अशा सूचना ना. मुनगंटीवार यांनी केल्या. श
यासाठी चंद्रपूर जिल्हा विकास निधी, चांदा ते बांदा कार्यक्रम, मानव विकास मिशन यामधून निधी उपलब्ध करून देता येऊ शकेल. ज्या सहकारी मत्स्य व्यवसाय संस्था कार्यक्षम आणि पारदर्शकपणे व्यवहार करतील, अशा स्थानिक संघांना १ हजार हेक्टरपर्यंतचे तलाव देण्यात यावेत. जिल्ह्यात मत्स्यबीज केंद्रे सुरु आहेत का, असल्यास त्यांची स्थिती कशी आहे, याचा अभ्यास केला जावा. गरज पडल्यास नवीन दोन केंद्राचे प्रस्ताव तयार करून ते मंजुरीसाठी पाठविण्यात यावेत, जे संघ शासकीय धोरणाच्या अधीन राहून ही केंद्रे चालवण्यास तयार आहेत, त्यांचा यासाठी विचार केला जावा असेही ना. मुनगंटीवार म्हणाले. बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय विकास, क्षमता आणि स्थिती याचे सादरीकरण करण्यात आले.