नियमात अडकले मुस्लीम समाजाचे आरक्षण
By Admin | Updated: August 13, 2014 23:44 IST2014-08-13T23:44:24+5:302014-08-13T23:44:24+5:30
सर्व समाजाची समप्रमाणात प्रगती व्हावी कोणीही वंचित राहू नये, शिक्षण, नोकरी, आदींमध्ये सर्वांचा वाटा रहावा यासाठी शासनाने आरक्षण जाहीर केले आहे. काही दिवसापूर्वी मुस्लिम आणि मराठा

नियमात अडकले मुस्लीम समाजाचे आरक्षण
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
सर्व समाजाची समप्रमाणात प्रगती व्हावी कोणीही वंचित राहू नये, शिक्षण, नोकरी, आदींमध्ये सर्वांचा वाटा रहावा यासाठी शासनाने आरक्षण जाहीर केले आहे. काही दिवसापूर्वी मुस्लिम आणि मराठा समाजालाही आरक्षण दिले आहे. मात्र मुस्लिम समाजाला जातीचे प्रमाणपत्र काढताना मोठी अडचण येत आहे. त्यामुळे आरक्षण मिळूनही या समाजाला विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे अधिकारीही शासनाकडे बोट दाखवून त्यांना हेलपाटे मारावयास लावत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने मुस्लिम समाज आहे. या समाजामध्ये बोटावर मोजण्याइतके नागरिक सोडले तर, शैक्षणिक दृष्ट्याही समाज प्रगत नाही. त्यामुळे त्यांना शासकीय नोकरीपासूनही वंचित रहावे लागत आहे. इतर समाजाच्या तुलनेत या समाजाचीही प्रगती व्हावी यासाठी शासनाने नुकतेच आरक्षण जाहीर केले आहे. मात्र याचा लाभ घेण्यासाठी या समाजाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे सर्व करूनही शासनस्तरावर प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. मागील काही दिवसांपासून या समाजातील विद्यार्थी तसेच नागरिक सेतू केंद्रात आरक्षणासंदर्भात प्रपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र आपल्याकडे काहीच नसल्याचे सांगून सेतू संचालक अधिकाऱ्यांकडे बोट दाखवित आहे. त्यामुळे समाजातील नागरिक या अधिकाऱ्यांकडून त्या अधिकाऱ्याकडे जात प्रमाणत मिळविण्यासाठी चकरा मारीत आहे. शासनाने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले मात्र जीआरमध्ये दिलेले नियम वेगळेच असल्याने प्रमाणपत्र देताना त्रास होत असल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर मुस्लिम समाजाच्या विद्यार्थी किंवा इतर नागरिकांच्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर जातीचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळेच त्यांचे प्रमाणपत्र अडले असल्याचेही काहींचे म्हणणे आहे.
या सर्व प्र्रकारामध्ये मागील अनेक वर्षांपासून आरक्षण मिळेल या आशेवर असलेल्या मुस्लिम बांधवांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. आता अधिकाऱ्यांनी यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागितले असून ते आल्यानंतरच प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.