बळीराजाचे आयुष्य बदलविणारा संशोधक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:25 IST2018-06-03T23:25:38+5:302018-06-03T23:25:50+5:30

बळीराजाचे आयुष्य बदलविणारा संशोधक
राजेश मडावी।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथांवर मात करण्यासाठी दादाजी खोब्रागडे यांनी विद्यापीठीय संशोधकांना लाजवेल, अशा पद्धतीचे मूलगामी संशोधन कृषी क्षेत्रात केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी दिवसरात्र संशोधनात मग्न राहून भातशेतीचे कृषिविज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर नेणाऱ्या शेतीनिष्ठ संशोधकाच्या निधनाने कृषी संशोधन व विस्तार कार्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
नागभीड तालुक्यातील नांदेड येथे अल्पभूधारक शेतकरी म्हणून सुरुवातीला पारंपारिक शेती करीत होते. दादाजींनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या आजारपणाच्या खर्चासाठी तीन एकर भाताची शेती विकली होती. सुनेच्या वडिलांनी दिलेल्या दीड एकर शेतीवर घरातल्या सहा जणांचा चरितार्थ चालत होता. घर चालविण्याबरोबरच नातवंडांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी दादाजी आपली शेती सांभाळून दुसºयांच्या शेतीवर मजुरी करू लागले. १९८३ ला दादाजींनी शेतात पहिल्यांदा ‘पटेल’ या जातीच्या धानाची लागवड केली. पिकांचे सूक्ष्म निरीक्षण करताना त्यांना धानाच्या तीन रोपांच्या पांढऱ्या लोंबीवर पिवळे ठिपके दिसले. तीन रोपांचे बी वेगळे काढून पुढील हंगामात त्याच बियांची पेरणी केली. हे धानाचे पीक आवडल्याने दादाजींनी त्याचेच पुढे बीजगुणन सुरू ठेवले. परिसरातील शेतकऱ्यांना आवडल्याने मागणी वाढली. हेच वाण पुढे लोकप्रिय ‘एचएमटी सोना’ या नावाने शेतकऱ्यांची मने जिंकली. मातीत राबवूनही शेतकºयांच्या हातात फारसे उत्पन्न येत नसल्याचे पाहून भात शेतीच्या समस्यांच्या मूळाशी गेले आणि उपाययोजना शोधली. परिसरातील शेतकºयांशी संवाद साधून शेतीचे निरीक्षण करण्याची त्यांच्याकडे विलक्षण हातोटी होती. त्यामुळे पर्यावरणाच्या सर्व बदलांचा आमूलाग्र अभ्यास करून भाताचे नवीन वाण विकसित केले. हा प्रयोग स्वत:च्या शेतीतूनच सुरुवात केला होता. भाताचे एचएमटी वाण हे दादाजी खोब्रागडे यांच्या प्रचंड परिश्रमाचे प्रतीक आहे. या संशोधनामुळे दादाजी खोब्रागडे यांना राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनीही गौरव केला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘फोर्ब्स’ ने दादाजींच्या संशोधनाची दखल घेतली. परंतु, आयुष्याच्या उत्तरार्धात दादाजींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. दरम्यान माध्यमांनी दादाजींची व्यथा मांडल्यानंतर राज्य सरकारने दोन लाखांची मदत केली होती. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही आर्थिक मदत करून कृतज्ञता व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या जीवनातील दाहकता सोसून शेतीतच संशोधन करणाऱ्या दादाजींच्या निधनाने समग्र कष्टकरी समुदायांमध्येच शोककळा आहे.