इरई नदीचा श्वास मोकळा
By Admin | Updated: May 22, 2015 01:18 IST2015-05-22T01:18:50+5:302015-05-22T01:18:50+5:30
इरई नदी चंद्रपूरकरांसोबतच अनेक गावांची तहान भागविणारी नदी आहे. चंद्रपूर शहराला ही नदी लागून असतानाही या नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही.

इरई नदीचा श्वास मोकळा
इरई नदी चंद्रपूरकरांसोबतच अनेक गावांची तहान भागविणारी नदी आहे. चंद्रपूर शहराला ही नदी लागून असतानाही या नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही. अलिकडच्या काळात चंद्रपूर शहरासह जिल्ह्याचा औद्योगिक विकास झाला. एमईएल, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, वेकोलिच्या कोळसा खाणी व चंद्रपूर एमआयडीसीमध्ये अनेक उद्योग आले. या उद्योगांतील दूषित पाणी इरई नदीतच सोडले जाऊ लागले. पठाणपुरा गेट बाहेर इरई नदीच्या पात्राला लागूनच वेकोलिचे मातीचे महाकाय ढिगारे तयार केले. या ढिगाऱ्यामुळे इरई नदीचे पात्रच बदलले. याशिवाय पावसाळ्यात इरई नदीतील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला. यामुळे अनेकदा इरई नदी कोपून चंद्रपूरकरांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. तरीही प्रशासनाला दखल घ्यावीशी वाटली नाही. या नदी पात्रातून सातत्याने रेतीचा उपसा केला जाऊ लागला. त्यामुळेदेखील इरई नदीवर विपरित परिणाम झाला. याशिवाय शहरातील केरकचरा याच नदीत टाकला जात होता. या सर्व प्रकारामुळे इरई नदीचे नैसर्गिक सौंदर्यच नष्ट झाले. सद्यस्थितीत या नदीचे दोन अतिशय लहान पात्र निर्माण झाले आहे. याशिवाय गाळ कधीच उपसण्यात न आल्याने सध्या या नदीत प्रचंड गाळ साचला आहे.
वायू प्रदूषणासोबत जलप्रदूषणातही जिल्हा कुप्रसिध्द होत असल्याचे आता सर्वांना ठाऊक आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ नावाचे कार्यालय आणि त्यातील अधिकारी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात कार्यरत आहेत. मात्र ते काय काम करतात, हे कुणालाच ठाऊक नाही. कारण प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढतच आहे. याविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाला काही सोयरसूतक असल्याचे आजवर कधीच दिसले नाही.
चंद्रपूर शहरात नानाविध संस्था सामाजिक कार्य करीत आहेत. चंद्रपूर जिल्हा प्रदूषित जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. विविध मुद्यांवर या संस्थांनी आजवर आंदोलने केली आहेत. मात्र जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या आणि प्रदूषणामुळे त्यांची होत असलेली वाताहात त्यांना अंतर्बाह्य अस्वस्थ करू शकली नाही. उन्हाळ्यात पाण्यासाठी टाहो फोडला जातो. मात्र वाहती नदी डोळ्याआड करून तिचे वाटोळे होत असतानाही जीवनदायिनींना वाचविण्यासाठी प्रशासनाला गदगद हालविले जात नाही. बोटावर मोजण्याएवढ्या एकदोन जणांनी आपआपल्या परीने प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना पुढाऱ्यांची आणि प्रशासनाची फारशी साथ मिळाली नाही.
कुशाब कायरकर यांच्या ‘वृक्षाई’ व इरई नदी बचाव संघर्ष समितीने यासाठी आंदोलने केली. वृक्षाईचा ट्री बॉय अजिंक्य कायरकर याचा वाढदिवसच इरई नदीच्या पात्रात साजरा करून वृक्षाईने प्रशासनाचे लक्ष वेधले. याशिवाय समितीनेही इरई नदी पात्रात बसून आंदोलने केली. ‘लोकमत’ने इरई नदी पात्राची होत असलेली वाताहात वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली.
अखेर आता प्रशासनाला जाग आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैेसेकर यांनी यासाठी पुढाकार घेत वेकोलि व वीज केंद्राला सहकार्य करण्यास भाग पाडले. त्यातून सिंचन विभागाद्वारे इरई नदीच्या खोलीकरणाला प्रारंभ झाला आहे. ही मोहीम पावसाळा सोडून दीड वर्ष राबविण्यात येणार आहे. इरई नदीतील गाळ काढून नदीचे खोलीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय इरई नदीपात्र वाढलेली अनावश्यक झाडेही काढली जाणार आहे.
११ कोटींचा खर्च अपेक्षित
पडोली पूल ते चवराळा पुलापर्यंतच्या इरई नदीच्या पात्राचे खोलीकरण करण्यात येणार आहे. हे पात्र सहा किलोमीटर अंतराचे आहे. यासाठी ११ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती सिंचन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. यातील साडेपाच कोटी वेकोलिने देण्याचे मान्य केले असून दोन कोटी रुपये वीज केंद्र व्यवस्थापन देणार असल्याची माहिती आहे. वेकोलिने दोन कोटींचा पहिला हप्ता सिंचन विभागाला दिल्याचीही माहिती आहे.
वेकोलिच्या जागेवर टाकणार गाळ
सहा किलोमीटर नदी पात्राचे खोलीकरण केल्यानंतर अंदाज सात लाख क्युबिक मीटर गाळ निघण्याचा सिंचन विभागाचा अंदाज आहे. हा गाळ टाकण्यासाठी वेकोलिने दे.गो. तुकूम परिसरातील आपल्या अखत्यारित असलेली जागा दिली आहे. या जागेत गाळ टाकला जाणार असल्याचीही माहिती आहे.
इरईचे खोलीकरण करण्यासंदर्भात एका समितीचे गठण करण्यात आले आहे. अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे समितीचे अध्यक्ष आहेत. इरई नदीचे खोलीकरण पावसाळ्यापर्यंत करण्यात येईल. त्यानंतर पावसाळा गेल्यावर पुन्हा काम सुरू होईल. पुढील वर्षात काम पूर्ण होऊ शकेल.
-राजेश सोनोणे
कार्यकारी अभियंता,
सिंचन विभाग, चंद्रपूर.