Relief to ten thousand laborers in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यातील दहा हजार मजुरांना दिलासा

चंद्रपूर जिल्ह्यातील दहा हजार मजुरांना दिलासा

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांची माहिती : तेलंगणात अडकलेल्यांना राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रवासावरही अटी लावण्यात आल्या आहेत. यामुळे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील जे मजूर तेलंगणा राज्यात अडकले आहेत, अशा दहा हजार मजुरांना आहेत त्या ठिकाणी राहण्याची आणि भोजनासह खाण्यापिण्याची व्यवस्था तेलंगणा सरकार करून देणार असल्याने त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मिरची तोडण्याच्या मजुरीसाठी ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही या तालुक्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील किमान दहा हजार मजूर तेलंगणा राज्यातील विविध गावात गेले असता अचानक लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे तेलंगणा राज्यात अडकून पडले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. यामुळे या मजुरांना स्वगृही परतण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती मजुरांच्या नातेवाईकांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना दूरध्वनीवरून दिली.ही माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वणीवरून संपर्क साधून तेलंगणात अडकलेल्या सर्व मजुरांना स्वगृही आणण्याची तसेच या मजुरांना आहे त्याठिकाणी राहण्याची, भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची विनंती केली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीची मुख्यमंत्री यांनी दखल घेतली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगना राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये या विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली असता देशात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील मजूर तेलंगणा राज्यात असेल तर त्या संपूर्ण मजुरांच्या खानापिण्याची, जेवणाची व राहण्याची व्यवस्था तेलंगणा सरकार करणार आणि तेलंगणा राज्यातील मजूर महाराष्ट्र राज्यात असेल तर त्या मजुरांची संपूर्ण व्यवस्था महाराष्ट्र सरकार करणार असल्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांची आहे त्याच ठिकाणी व्यवस्था होणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांना या कामात मदत करण्याचे निर्देश दिले. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांना दूरध्वणीवरून माहिती दिली. लॉकडाऊनमुळे या मजुरांना जिल्ह्यात परत आणता येत नसल्याने आहे त्या ठिकाणी त्यांची संपूर्ण व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनाही निर्देश
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील जे मजूर तेलंगणात अडकले आहेत, त्यांची संपूर्ण माहिती संबंधित यंत्रणेकडून घेऊन त्यांची मोबाईल नंबरसह संपूर्ण माहिती देण्याचे निर्देशही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. मजुरांच्या सुरक्षिततेसाठी तेलंगणा प्रशासनाशी सतत संपर्क साधला जात आहे. जिल्हा प्रशासनही याकडे लक्ष ठेऊन दररोज माहिती घेतली जात आहे. त्यामुळे परराज्यात असलेल्या मजुरांच्या कुटुंबियांनी काळजी करू नये, असे आवाहन ना. वडेट्टीवार यांनी मजुरांच्या कुटुंबियांना केले आहे.

Web Title: Relief to ten thousand laborers in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.