रिलायन्स जीओने वाढविला भावनांचा गुंता

By Admin | Updated: July 1, 2014 23:24 IST2014-07-01T23:24:25+5:302014-07-01T23:24:25+5:30

चंद्रपूर महानगर पालिकेच्या राजकारणातील गुंता रिलायन्स जीओमुळे वाढला आहे. महानगर पालिकेच्या सभागृहात आमसभेच्या दिवशी काय नाट्य घडायचे ते घडो, मात्र पडद्यामागे बरेच काही

Reliance Gio boosts sentiment | रिलायन्स जीओने वाढविला भावनांचा गुंता

रिलायन्स जीओने वाढविला भावनांचा गुंता

चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेच्या राजकारणातील गुंता रिलायन्स जीओमुळे वाढला आहे. महानगर पालिकेच्या सभागृहात आमसभेच्या दिवशी काय नाट्य घडायचे ते घडो, मात्र पडद्यामागे बरेच काही नाट्य सुरू असल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा जीव मात्र टांगणीला लागल्यासारखी अवस्था झाली आहे.
२५ जूनला काँग्रेससह अन्य पक्षातील २९ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी, आयुक्त आणि महापौरांकडे निवेदन सादर करून रिलायन्स जीओला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे. त्या दिवसांपासून मनपातील पदाधिकारी आणि नगरसेवकांमधील अंतर वाढले आहे. हे अंतर कमी होण्याच्या दृष्टीने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत असला तरी, अद्याप यश न आल्याने हे वाढलेले अंतर आठवडाभरानंतरही कायमच दिसत आहे.
अशातच काँग्रेससह भाजपा, शिवसेना नगरसेवकांनी सोमवारच्या मनपाच्या आमसभेमध्ये रिलायन्सच्या मुद्यावरून महापौर संगीता अमृतकर, स्थायी समितीचे अध्यक्ष रामू तिवारी आणि उपमहापौर संदीप आवारी यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याच पक्षातील नगरसेवकांकडून विरोध होत असल्याचे हे पदाधिकारी सभागृहात प्रथमच ‘याची देही याची डोळा’ पहात होते. त्यामुळे सभेतील नुर पालटलेला होता.
काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपल्याच पदाधिकाऱ्यांविरूद्ध घेतलेल्या विरोधाच्या भूमिकेचा पुरेपूर फायदा उचलण्याची खेळी भाजपानेही आखली आहे.
काँग्रेस नगरसेवकांच्या या विरोधाला साथ देण्याचे काम भाजपा नगरसेवकांनी सभागृहात केल्यामुळे सध्या महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष एकाकी पडल्यासारखे दिसत आहेत.
दरम्यान, काँग्रेसच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी रिलायन्सच्या मुद्यावरून ४ जुलैला चंद्रपूर बंदची साद दिली आहे. यामुळे मनपातील आणि शहरातील वातावरण पुन्हा गरम होण्याचे चित्र दिसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Reliance Gio boosts sentiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.