महावितरणच्या प्रादेशिक संचालकांचा ग्राहकांशी संवाद
By Admin | Updated: July 2, 2017 00:37 IST2017-07-02T00:37:22+5:302017-07-02T00:37:22+5:30
महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागाचे संचालक भालचंद्र खंडाईत यांनी शुक्रवारी चंद्रपूर परिमंडळातील वरोरा, भद्रावती, चंदनखेडा तसेच वीज खांब निर्मिती कारखाना पिंपळगाव आदी भागाचा दौरा केला.

महावितरणच्या प्रादेशिक संचालकांचा ग्राहकांशी संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागाचे संचालक भालचंद्र खंडाईत यांनी शुक्रवारी चंद्रपूर परिमंडळातील वरोरा, भद्रावती, चंदनखेडा तसेच वीज खांब निर्मिती कारखाना पिंपळगाव आदी भागाचा दौरा केला. ग्राहक सेवेत सुधारणा घडवून आणणे, महावितरणच्या वीज यंत्रणेची गुणवत्ता वाढवून ग्राहकांना शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध करून देणे, ग्राहक व महावितरणमध्ये दुतर्फा संवादास चालना मिळून ग्राहकांच्या सूचना स्वीकारून ग्राहकाभिमूख सुधारणा घडवून आणणे हे या दौऱ्याचे उद्दीष्ट होते.
खंडाईत यांनी वरोरा विभाग तसेच भद्रावती उपविभागातील सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांनी ताडोबा जंगलातून गेलेल्या महावितरणच्या ११ केव्ही वीज वाहिनीचा वापर करून वन्यप्राण्यांच्यातसेच वाघाच्या होणाऱ्या शिकारीवर कसा आळा घालता येवू शकतो याबद्दल स्थनिक अभियंता, कर्मचारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. ग्राहकहितास सर्वोच्च प्राधान्य देवून ग्राहकांना गुणवत्तापूर्ण, योग्य दाबाचा वीजपुरवठा करीत ग्राहकांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे निर्देश दिले. तसेच विहित मुदतीत वीज बिलाची वसुली करून थकबाकीस आळा घालणे व वीजहानी कमी करण्याचे निर्देश दिले.
भद्रावती येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. उत्तम घोसरे, सचिव अ.ग. जोशी, वामनराव नामपल्लीवार, पांडूरंग मत्ते, भद्रावती नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष राजू मुर्लीधर गुंडावार, सरपंच प्रदीप शंकरराव महाकुलकर आदींशी त्यांनी संवाद साधला. महावितरणद्वारा ग्राहकसेवा सुधारणेच्या दिशेने त्यांच्या सुचना ऐकूण घेतल्या. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या सदस्यांनी महावितरणच्या एकंदरीत कामाबद्दल समाधान व्यक्त करीत महावितरणला सर्वप्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. चंद्रपूर परिमंडळात नुकतेच महावितरणने सर्व उपविभागीय कार्यालयात घेतलेल्या ग्राहक तक्रार निवारण शिबिराची प्रशंसा करीत ग्राहकांशी संवाद वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या.