‘रेफर टू नागपूर’ पेशंटची अँम्ब्युलन्स पोहोचली चंद्रपूरच्या मल्टी स्पेशालिटीत
By Admin | Updated: August 12, 2014 23:40 IST2014-08-12T23:40:07+5:302014-08-12T23:40:07+5:30
गंभीर रूग्णांवर कसलाही उपचार न करण्याची जोखीम न बाळगता ‘रेफर टू नागपूर’ असा शेरा देऊन नागपूरकडे बोळवण करण्याचा प्रकार चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयाला नवा नाही.

‘रेफर टू नागपूर’ पेशंटची अँम्ब्युलन्स पोहोचली चंद्रपूरच्या मल्टी स्पेशालिटीत
चंद्रपूर : गंभीर रूग्णांवर कसलाही उपचार न करण्याची जोखीम न बाळगता ‘रेफर टू नागपूर’ असा शेरा देऊन नागपूरकडे बोळवण करण्याचा प्रकार चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयाला नवा नाही. मात्र नागपूरला रेफर केलेला रूग्ण चक्क चंद्रपुरातील एका मल्टी स्पेशालिटीत पोहोचविण्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. मात्र रूग्णाची आर्थिक स्थिती तेथील खर्च झेपण्याएवढी नसल्याने तब्बल तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा या रूग्णाचा नागपूरच्या मेडिकल कॉलेजकडे प्रवास सुरू झाला.
प्रीती प्रशांत मांडवकर असे या रूग्णाचे नाव असून मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ती गंभीर अवस्थेत नातेवाईकांसह येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी आली होती. मात्र तिची प्रकृती लक्षात घेऊन तिला नागपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये भरती होण्याचा सल्ला देण्यात आला. रूग्णालयाच्या सेवेत असलेल्या चारही रूग्णवाहिका बाहेर असल्याने १०८ टोल फ्री वरून रूग्णवाहिका पाचारण करण्यात आली. डॉक्टरांनी रूग्णवाहिकेत सेवेवर असलेल्या डॉ.कोरडे यांना रूग्णाचे डिस्चार्ज कार्ड देऊन नागपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्याच्या सूचना दिल्या. ही रूग्णवाहिका रूग्णालयातून निघाली. मात्र नागपूरकडे न जाता जनता कॉलेजजवळील वासाडे मल्टीस्पेशालिटीत पोहोचली. तिथे रूग्णाच्या नातेवाकाईकांना कसलीही पूर्वसूचना न देता अथवा त्यांच्याशी चर्चा न करता रूग्णाला उतरविण्यात आले. येथील डॉक्टर आधी उपचार करतील, त्यानंतर नागपूरला जायचे किंवा काय हे ठरवितील, असे सांगण्यात आले. भांबावलेले रूग्णाचे नातेवाई रूग्णाला डॉक्टरकडे नेत असतानाच ही अॅम्ब्युलन्स तिथून निघूनही गेली. तेथील डॉक्टरांनी २० ते २५ हजार रूपयांचा खर्च येईल, असे सांगितल्याने त्यांचे त्राणच गळाले. अखेर नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्यावर पलिकडून पुन्हा जिल्हा सामान्य रूग्णालयात परत या, असे सांगण्यात आले. अखेर अशा बिकट परिस्थितीत रूग्णांच्या नातेवाईकांनी आॅटोने रूग्णाला सामान्य रूग्णालयात परत आणले. त्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा १०८ वर संपर्क साधून त्याच रूग्णवाहिकेने या रूग्णाला नागपूरला रवाना केले. प्रत्यक्षात पहिल्यांदा दुपारी ४ वाजता नागपूरला निघालेला हा पेशंट सायंकाळी ६.३० पर्यंत नागपुरात पोहोचला असता. मात्र निव्वळ रूग्णवाहिकेतील डॉक्टरच्या चुकीमुळे नागपूरचा प्रवास दुसऱ्यांदा सायंकाळी पावणेसहा वाजता सुरू झाला. या काळात रूग्णाला आणि त्यांच्या नातेवाईकांना ज्या मनस्थितीतून जावे लागले, ते मात्र शब्दांच्या पलिकडचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)