पशुधनात होत आहे घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:31 IST2017-11-02T23:30:54+5:302017-11-02T23:31:08+5:30

पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत सिंदेवाही तालुक्यात मोठी घट झाली आहे.

Reduction in livestock | पशुधनात होत आहे घट

पशुधनात होत आहे घट

ठळक मुद्देचाराटंचाई कारणीभूत : गावोगावी दूध व शेणखताची चणचण

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत सिंदेवाही तालुक्यात मोठी घट झाली आहे. यासाठी जनावरांचा चारा व पाण्याची भेडसावणारी समस्या कारणीभूत ठरत आहे.
शेतकरी व शेतमजुरांनी जनावरे मिळेल त्या भावात विक्रीचा सपाटा सुरू केल्याने गावरानी जनावरे कमी होत आहेत. भारतातील ९० टक्के जनता आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. पूर्वी शेतीच्या मशागतीसाठी शेतकरी बैलाचा वापर करायचे. शेतकºयांच्या जीवा भावाचा सखा म्हणून बैलाची ओळख होती. आधुनिक काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे यांत्रिक शेतीकडे शेतकरी वळत आहेत तर दुसरीकडे शेतमजुरांच्या मजुरीत पन्नास पटीने वाढ झाली आहे. परिणामी शेती करणे धान उत्पादक शेतकºयांना परवडणारे नाही. बैलाची, गाय व म्हैस यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पूर्वी शेतकºयांच्या अंगणात बैलाचा गोठा असे. त्या गोठ्यात बैल दिसणे हे त्यांच्यासाठी भूषणावह होते. आता जनावरांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बैलाचे गोठे दिसेनासे झाले आहेत. पूर्वी जंगलात जनावरासाठी कुरण राखून ठेवायचे, आता कुरणही नष्ट होत आहेत. जनावरांपासून मिळणारे दूध, दही, लोणी, तूप शेतकºयांच्या घरीच बनविले जात होते. त्यावेळी ग्रामीण भागात दुधाची धवलक्रांती होती. लग्न कार्यप्रसंगी लागणारे दूध, दही गावातच मिळत होते. सोबत शेणखत तयार होते. शेतातील पिकाच्या उत्पादनात वाढ होत होती. त्यामुळे रासायनिक खताची गरज पडत नव्हती. प्रत्येक गावात दोन चार गुराखी जनावरांचे कळप जंगलात चारायला नेत होते. आता जंगले नष्ट होऊ लागल्याने जनावरांना चारा मिळणे कठीण झाले आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. चारा व पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी व शेतमजुरांनी गेल्या दहा वर्षात पाळीव जनावरे विकण्याचा सपाटा सुरू केला आहे. विक्रीस काढलेली जनावरे घेण्यास पुन्हा दुसरे शेतकरी उत्सुक नसतात. त्यामुळे आता दुधाळ जनावरे दसºयालाच विकावी लागतात.
जंगल विरळ
सध्या सर्वत्र जंगले विरळ होत आहेत. अवैध वृक्षतोडीला उधाण आले आहे. परिणामी जंगले कमी होत आहे. त्यामुळे जनावरांना हिरवा चारा मिळणे कठीण झाले आहे. जंगलात चाराच उपलब्ध नसल्याने जनावरांना कुठे चारावे, असा प्रश्न पशु पालकांना पडला आहे. त्यातच काही जंगलावर अतिक्रमण झाले. अतिक्रमणधारक तेथे शेती करतात. अतिक्रमणधारक शेतकरी गावातील जनावरांना तेथे चरण्यासाठी येऊ देत नाहीत. त्यामुळे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर आहे.

Web Title: Reduction in livestock