चंद्रपूर वीज केंद्रातून विक्रमी वीज उत्पादन
By Admin | Updated: May 27, 2017 00:34 IST2017-05-27T00:34:36+5:302017-05-27T00:34:36+5:30
२६ मे रोजी येथील वीज केंद्राच्या सात संचातून २४५२ मेगावाट वीज उत्पादनाचा नवीन उच्चांक गाठला.

चंद्रपूर वीज केंद्रातून विक्रमी वीज उत्पादन
महानिर्मितीची माहिती : २४५२ मेगावॅटचे उत्पादन, संपानंतरही वीज उत्पादन सुरळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : २६ मे रोजी येथील वीज केंद्राच्या सात संचातून २४५२ मेगावाट वीज उत्पादनाचा नवीन उच्चांक गाठला. लवकरच या संचातून २७०० मेगावाट इतक्या वीज उत्पादनाचे लक्ष्य गाठण्याचे नियोजन असल्याची माहिती वीज केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी दिली आहे.
महानिर्मितीच्या चंद्रपूर वीज केंद्राची स्थापित क्षमता २९२० मेगावाट इतकी असून येथे प्रत्येकी २१० मेगावाट क्षमतेचे दोन संच क्रमांक ३ व ४ तसेच ५०० मेगावॉट क्षमतेचे पाच संच क्रमांक ५,६,७,८,९ संच कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, मागील सहा दिवसांपासून राज्यभरातील विविध विद्युत केंद्रात कंत्राटी कामगारांचा संप सुरु आहे. मात्र, महानिर्मितीचे अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी, कंत्राटदार व काही कंत्राटी कामगारांनी घेतलेल्या सांघिक परिश्रमातून महानिर्मितीच्या औष्णिक, जल, वायू व सौर वीज केंद्रांतून दररोज सुमारे ७००० मेगावाट इतके अखंडित वीज उत्पादन ठेवणे शक्य झाले आहे. यातून राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रखर उन्हाळा, विजेची वाढती मागणी आणि कंत्राटी कामगारांचा संप अशा पार्श्वभूमीवर आगामी काळात, मागणीनुसार वीज उत्पादनाचे लक्ष्य गाठण्याचे नियोजन महानिर्मितीकडून करण्यात आले आहे.
राज्यभरात चार संच बंद
मागील काही दिवसांत विदर्भात ४७ अंश पेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली असून सर्वदूर प्रखर उन्हाळा असल्याने विविध विद्युत उपकरणांचा वापर वाढला आहे. पयार्याने राज्यात विजेची मागणी सातत्याने वाढतच आहे. राज्यभरातील महानिर्मितीच्या २७ संचांपैकी २३ संचांतून वीज उत्पादन सुरु असून ४ संच तांत्रिक कारणांसाठी तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. लवकरच या संचांतून देखील वीज उत्पादन घेण्यात येणार आहे.
कामगारांच्या संपाचा परिणाम नाही
वीज केंद्रातील कंत्राटी कामगरांचा संप सुरू असून महानिर्मितीच्या भुसावळ वीज केंद्रातील कंत्राटी कामगार कामावर रुजू झाले आहेत. चंद्रपूर व खापरखेडा वीज केंद्र वगळता महानिर्मितीच्या इतर वीज केंद्रात संपाचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. एकूणच, कंत्राटी कामगारांच्या संपामुळे वीज उत्पादनावर कुठलाही विपरीत परिणाम झाला नसल्याचे महानिर्मितीच्या सूत्रांकडून कळते.