रेमडेसिविरसाठी लोकप्रतिनिधींची शिफारस ग्राह्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:46 IST2021-05-05T04:46:22+5:302021-05-05T04:46:22+5:30
चंद्रपूर : जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्याची प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून रुग्णांचे नातेवाईक अथवा लोकप्रतिनिधी यांच्या सांगण्यावरून किंवा ...

रेमडेसिविरसाठी लोकप्रतिनिधींची शिफारस ग्राह्य नाही
चंद्रपूर : जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्याची प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून रुग्णांचे नातेवाईक अथवा लोकप्रतिनिधी यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या शिफारशीने वाटप न होता सदर रुग्णालयात प्राप्त होणाऱ्या साठ्यातून त्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनच्या आधारे व गरजेनुसारच रेमडेसिविर इंन्जेक्शनचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार रेमडेसिविर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप करण्यात येते. यात मुख्य उत्पादकाकडून, वितरक व स्टॉकिस्टकडे इंजेक्शन प्राप्त होतात. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्याकडून जिल्ह्यात कार्यरत कोविड रुग्णालये, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल यामध्ये भरती रुग्णांच्या आधारे रुग्णालयनिहाय समप्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन वाटपाचे वर्गीकरण करून ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मान्यतेप्रमाणे संबंधित रुग्णालयांच्या औषध विक्रेत्याकडे वर्ग करण्यास आदेशित करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोविड रुग्णालयांच्या डॉक्टरांद्वारे त्यांच्या रुग्णालयात भरती रुग्णांची तपासणी करून ज्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे त्यांना क्रमाने इंजेक्शनबद्दलचे प्रिस्क्रिप्शन देऊन सदर प्रिस्क्रिप्शन आधारे त्या रुग्णालयास संलग्न औषध वितरकाकडे इंजेक्शन प्राप्त करून घेण्यासाठी पाठविण्यात येते. औषध वितरकाने ज्याप्रमाणे डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिले आहे, त्याच क्रमाने प्रिस्क्रिप्शनधारकास इंजेक्शन देण्यात येईल. औषध वितरकाने इंजेक्शन देण्याबद्दलची व रुग्णांची सविस्तर नोंद घेऊन शासनाने निर्धारित करून दिलेले दर आकारावे. त्यानंतर सदर तपशील दररोज सायंकाळी अन्न व औषध प्रशासन विभागास सादर करावा. अन्न व औषध प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालयास सदर तपशील सादर करतील. असेही त्यांनी म्हटले आहे. प्राप्त यादीतील तपशिलाची तपासणी व पडताळणी नियंत्रण कक्षाद्वारे केली जाईल. यासाठी ठराविक रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.