जलस्वराज्य प्रकल्पातून शुद्ध पाणी मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 22:28 IST2018-08-11T22:27:46+5:302018-08-11T22:28:10+5:30
जलस्वराज्य दोनमध्ये महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर असून सात निमशहरी व ३३ पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून प्रकल्प पूर्ण करावे. गावातील प्रत्येक व्यक्तीला पिण्याचे शुद्ध पाणी देणे ही महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व जिल्हा परिषदेची जबाबदारी आहे, असे मत जागतिक बँकेचे प्रतिनिधी सत्या पल्लागणी यांनी केले.

जलस्वराज्य प्रकल्पातून शुद्ध पाणी मिळावे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जलस्वराज्य दोनमध्ये महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर असून सात निमशहरी व ३३ पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून प्रकल्प पूर्ण करावे. गावातील प्रत्येक व्यक्तीला पिण्याचे शुद्ध पाणी देणे ही महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व जिल्हा परिषदेची जबाबदारी आहे, असे मत जागतिक बँकेचे प्रतिनिधी सत्या पल्लागणी यांनी केले.
गुरूवारी जलस्वराज्य- दोनमधील सरू असलेल्या कामांची तांत्रिक पाहणी करताना ते वरोरा तालुक्यातील एकाजुर्ना येथे बोलत होते.
यावेळी एकाजुर्नाचे सरपंच राजू रणदिवे, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष लक्ष्मण चिंचोळकर, ग्रामसेवक चाफले, कुचनाचे सरपंच ठाकरे, ग्रामसेवक मेश्राम, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कार्यकारी अभियंता संजय वाघ, शाखा अभियंता बाराहाते, भालाधरे, स्नेहा रॉय, प्रवीण खंडारे, कुणाल शितोळे, अंजली डाहुले, प्रगती बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वरोरा तालुक्यातील एकाजुर्ना व भद्रावती तालुक्यातील कुचना, काटवल भगत व बेलोरा येथील कामांची तांत्रिक पाहणी केल्यानंतर सत्या पल्लागणी यांनी अनेक सूचना केल्या. प्रकल्प व्यवस्थापक देवेंद्र लांडगे, शाखा अभियंता साळवी यांनी प्रकल्पाच्या वाटचालीची माहिती दिली.
पल्लागणी म्हणाले, मार्च २०१९ पर्यंत ही योजना पूर्ण होऊन गावातील प्रत्येक घरात मीटरद्वारे पाणी पोहचले पाहिजे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. यामध्ये तांत्रिक त्रुट्या राहु नये याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील सात योजनांकरीता ४१ कोटी रूपये खर्च केला जात आहे. पाणी गुणवत्तेसाठी ३३ गावांवर सहा कोटी ६० लाखांचा निधी उपलब्ध आहे. त्यामुळे या योजनेवर जागतिक बँक लक्ष ठेवून आहे. काही योजना नवीन संकल्पनेद्वारे तयार केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना चोवीस तास पाणी मिळणार आहे. ही योजना योग्यरित्या सुरू राहावी, यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य घ्यावे, असेही सत्या पल्लागणी यांनी सांगितले.
यावेळी प्रकल्प संचालक देवेंद्र लांडगे म्हणाले, आजही अनेक गावे या प्रकल्पात समाविष्ट होण्याकरिता प्रतीक्षा करीत आहेत. या योजनेचा पाणीकर कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायतला मिळाला पाहिजे तरच लाभ होऊ शकेल. पाणी गुणवत्ता गावांतील सर्व वॉटर एटीएमची पाहणीही केली.