पर्यटकांना खुणावणारा ‘भिमलकुंड’ उपेक्षितच

By Admin | Updated: November 10, 2014 22:40 IST2014-11-10T22:40:36+5:302014-11-10T22:40:36+5:30

माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी कोरपना तालुक्यातील सावलहिरा गावांपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर डोंगररांगात १५० फुट उंचीचा भिमलकुंड नावाचा धबधबा आहे. हा धबधबा पर्यटनप्रेमी व ट्रेकर्ससाठी

The reason for the tourists 'neglect' is irrelevant | पर्यटकांना खुणावणारा ‘भिमलकुंड’ उपेक्षितच

पर्यटकांना खुणावणारा ‘भिमलकुंड’ उपेक्षितच

जयंत जेनेकर - वनसडी
माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी कोरपना तालुक्यातील सावलहिरा गावांपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर डोंगररांगात १५० फुट उंचीचा भिमलकुंड नावाचा धबधबा आहे. हा धबधबा पर्यटनप्रेमी व ट्रेकर्ससाठी आकर्षण ठरत आहे. निसर्गरम्य सफारीची अनुभूती त्यांना येथून मिळत असते. मात्र भिमलकुंड धबधबा सध्या उपेक्षित असून याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणे गरजेचे आहे.
या ठिकाणी जाण्यासाठी कुठलाही पक्का रस्ता नाही. डोंगररांगातील हिरव्याकंच वनराईतून पायदळ वारी करत स्थळ गाठावे लागते. डोंगरदऱ्यामुळे येथे एखादा व्यक्ती रस्ता सोडून भटकण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील हिरवळ व धबधब्याचे सौंदर्य सर्वांनाच मोहित करीत आहे. सभोवताल हिरवे रान, त्यामध्ये असलेल्या डोंगरमाथ्यावरून खोल दरीत कोसळणारा धबधबा विलोभनीय दिसतो. पक्ष्यांचा किलबिलाट अन् खळाळणारा धबधबा मनाला भुरळ घालतो. येथील रानफूल सुगंधाची मुक्त हस्ताने उधळण करीत असतात. निसर्गाच्या या शॉवरखाली आंघोळ करण्याची मजा वेगळीच! त्यामुळे अनेकजण या धबधब्याला भेट देतात. सुमारे १५० फुट उंच कडावरुन कोसळणाऱ्या पाण्यामुळे खाली जमिनीवर कुंड तयार झाला.
या कुंडाला ‘भिमलकुंड’ म्हणून संबोधले जाते. या कुडांचे रुप हे भीमासारखे भासत असल्यानेच याचे नाव भिमलकुंड पडले असावे. मात्र येथील कडा उतरणे व चढणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळेच या धबधब्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणे आवश्यक आहे. येथे जाण्यासाठी मुख्य अडचण रस्त्याची असल्याने महिला, लहान मुले व वयोवृध्दांना या ठिकाणी सहज येता येत नाही. या डोंगरावर विविध वनऔषधी वनस्पती असल्याचे दिसून येते. येथील रस्त्याच्या कडेला आवळ्यांच्या रांगा आहे. या धबधब्यालगतच्या परिसरात नागाची खोरी, रोहिणी मुंडा, जांभुळधराची झिरणे आदी मनाला मोहित करणारी पर्यटनस्थळेही आहेत. परंतु विकास नसल्याने पर्यटनस्थळ म्हणून हे ठिकाण विकसित होऊ शकले नाही. या स्थळाचा पर्यटन विकास व्हावा, अशी निसर्गप्रेमींची अपेक्षा आहे.

Web Title: The reason for the tourists 'neglect' is irrelevant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.