मैदाने ही खरी वेलनेस सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:22 IST2019-07-22T23:21:25+5:302019-07-22T23:22:05+5:30
खेळांसाठीची मैदाने ही खऱ्या अर्थाने ‘वेलनेस सेंटर’ आहेत, खेळांसाठी अधिक निधी देणं म्हणजे आजारापासून दूर राहून आरोग्यावरचा खर्च कमी करणे आहे. हे लक्षात घेऊन राज्यात खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाईल, क्रीडापटंूना आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या दृष्टीने अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

मैदाने ही खरी वेलनेस सेंटर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खेळांसाठीची मैदाने ही खऱ्या अर्थाने ‘वेलनेस सेंटर’ आहेत, खेळांसाठी अधिक निधी देणं म्हणजे आजारापासून दूर राहून आरोग्यावरचा खर्च कमी करणे आहे. हे लक्षात घेऊन राज्यात खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाईल, क्रीडापटंूना आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या दृष्टीने अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
आज मिशन शक्तीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री आशिष शेलार यांच्यासह क्रीडा विभागाचे अधिकारी आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी उपस्थित होते.
सन २०२४ मध्ये होणाºया आॅलिंपिकमध्ये महाराष्ट्रातील खेळाडू जास्तीत जास्त संख्येने पदके प्राप्त करतील, यादृष्टीने मिशन शक्तीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शासन यावर ३०० कोटी रुपये खर्च करणार असून त्यापैकी १५० कोटी रुपये यावर्षी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती देऊन ना. मुनगंटीवार म्हणाले की, १९०० ते २०१९ या ११९ वर्षांच्या कालावधीत अमेरिकेने २६५०, रशियाने ११२२ आॅलिंपिक पदके मिळवली आहेत तर भारताने केवळ २८. आपण भारत माता की जय म्हणतो, तशी कृती आता २०२४ च्या आॅलिंपिकमध्ये पदके मिळवून करावयाची आहे. भारताचा तिरंगा अतिशय अभिमानाने फडकवायचा आहे. यासाठी आतापासून मिशन शक्ती अंतर्गत प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. ४ आॅगस्टला अभिनेता अमीर खान यांच्या उपस्थितीत या मिशनचे उदघाटन होत आहे. त्यावेळी ‘मी भारतासाठी सर्व शक्तीने आॅलिंपिकमध्ये सहभाग नोंदवेन आणि पदक मिळवीनच’ अशी शपथ विद्यार्थ्यांकडून घेतली जाणार आहे. मिशन शक्तीमध्ये आॅलिंपिकसाठी खेळाडूंची निवड करणे, त्यांना प्रशिक्षण देणे हे काम करण्यासाठी रिलायन्स समवेत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. काही खेळाडंवरील प्रशिक्षणाचा खर्च ही रिलायन्समार्फत केला जाणार आहे.
मिशन शौर्य, मिशन शक्ती आणि मिशन सेवा
चंद्रपूर आणि गडचिरोली हे आदिवासी आणि नक्षलग्रस्त जिल्हे आहेत. या जिल्ह्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मिशन शौर्य, मिशन शक्ती आणि मिशन सेवा हे उपक्रम राबविले जात असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले. आदिवासी मुले ही मुळात काटक असतात. त्यांच्यातील क्षमतांचा उत्तम प्रशिक्षणाच्या माध्यमातून विकास केल्यास ही मुलं देशासाठी गौरवास्पद कामगिरी करू शकतात. ही भावना लक्षात घेऊनच मिशन शौर्य अंतर्गत या दोन जिल्ह्यातील आदिवासी मुला-मुलींना एव्हरेस्ट मोहिमेसाठी तयार करण्यात आले. त्यांनी हे शिखर सरही केले. आयएएस, आयपीएस यासारख्या भारतीय प्रशासन सेवेत या दोन जिल्ह्यातील युवक-युवतींची संख्या वाढावी, यासाठी मिशन सेवा राबविले जात आहे. या जिल्ह्यातून नुकतेच दोन तरूण आयएएस झाले. भविष्यातही यात आणखी तरूण यशस्वी व्हावेत यासाठी प्रयत्न होणार आहे. आता मिशन शक्तीचे नियोजन करण्यात आले आहे. २०२४ च्या आॅलिंपिकसाठी तिरंदाजी, जिमनॅस्टिक, शुटिंग, जलतरण आणि वेट लिफ्टींगसह एकूण सात खेळांची निवड करण्यात आली आहे. या खेळांवर लक्ष केंद्रीत करून क्रीडापटूंना प्रशिक्षणासह सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा देण्यात येतील. ‘आता मेडल मिळवायचेच’ अशा पद्धतीने या सर्व खेळाडूंची तयारी करून घेतली जाईल, असेही अर्थमंत्री म्हणाले.
क्रीडा विभाग मिशन शक्तीला पूर्ण पाठबळ देणार- आशिष शेलार
२०२४ च्या आॅलिंपिकमध्ये मिशन शक्तीअंतर्गत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अधिकाधिक पदके प्राप्त करावीत. यासाठी मिशन शक्ती राबविले जात असून या मिशनला क्रीडा विभाग पूर्ण पाठबळ देईल, असे शालेय शिक्षण व क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयात क्रीडा विभांगतर्गत रिक्त असलेली पदे भरावीत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.