सिंदेवाही बालविकास प्रकल्प कार्यालय रामभरोसे

By Admin | Updated: September 4, 2014 23:43 IST2014-09-04T23:43:13+5:302014-09-04T23:43:13+5:30

सिंदेवाही येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात अनेक महत्वाची पदे रिक्त असून सध्या येथील कार्यालय ‘रामभरोसे’ सुरू आहे. येथील बालविकास प्रकल्प अधिकारी शिला मांडवकर यांची

Rambhrose Project Office of Sindhiya Balavikas | सिंदेवाही बालविकास प्रकल्प कार्यालय रामभरोसे

सिंदेवाही बालविकास प्रकल्प कार्यालय रामभरोसे

सिंदेवाही : सिंदेवाही येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात अनेक महत्वाची पदे रिक्त असून सध्या येथील कार्यालय ‘रामभरोसे’ सुरू आहे. येथील बालविकास प्रकल्प अधिकारी शिला मांडवकर यांची बदली नागपूरला झाली. त्यामुळे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. तसेच पर्यवेक्षकाची चार पदे रिक्त आहेत.
बालविकास प्रकल्प कार्यालयात अनेक योजना आहेत. परंतु अधिकारी व कर्मचारी नसल्यामुळे या योजनेच्या लाभापासून लाभार्थी वंचित आहेत. तर अंगणवाडी शिक्षणाचे तीन-तेरा वाजले आहेत.
या विभागामार्फत ० ते सहा वर्षे वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता यांच्यासाठी पूरक आहार, आरोग्य तपासणी, लसिकरण, संदर्भ सेवा, आरोग्य व सकस आहार विषयक शिक्षण आदि उपक्रम राबविले जातात. यातून बालमृत्यू व कुपोषणाचे प्रमाण कमी करणे असा हेतू आहे. तालुक्याची लोकसंख्या एक लाख २० हजार असून तालुकाअंतर्गत १७६ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. या अंगणवाडी केंद्राची आठ सर्कलमध्ये विभागणी केली असून या अंगणवाड्यांवर व सेविकेच्या कामकाजावर नियंत्रण व देखरेख करण्याकरिता एक प्रकल्प अधिकारी, एक विस्तार अधिकारी (सांख्यीकी) एक ज्येष्ठ व कनिष्ठ लिपीक, एक शिपाई व आठ पर्यवेक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र मागील एक वर्षांपासून या कार्यालयाला पूर्ण वेळ प्रकल्प अधिकारी नाही. आठपैकी चार पर्यवेक्षिका कार्यरत असताना दोन पर्यवेक्षकांची बदली झाली व एका पर्यवेक्षकांनी निवृत्ती घेतली आहे, तर एक पर्यवेक्षिका ३१ सप्टेंबरला सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे आता एकाच पर्यवेक्षिकेवर कार्यालयाचा कारभार चालविला जाणार आहे. सततच्या कार्यालयीन सभा, पंचायत समितीच्या सभा, महिला बालकल्याण विभागाच्या सभांना हजेरी लावता लावता त्यांनी दमछाक होत आहे. त्यासोबतच मासिक सभांना हजेरी लावणे, सोबतच मासिक अहवाल गोळा करणे, पाठविणे, अंगणवाडींना भेट देणे, संनियंत्रण ठेवणे त्यांना कठीण जात आहे.
परिणामी तालुक्यातील कार्यालय व अंंगणवाड्या रामभरोसे सुरू आहेत. अंगणवाडी केंद्रे आता केवळ पोषण आहार वाटप केंद्र ठरली आहेत.
आरोग्य विभागाच्या सहकार्याने लसीकरण, आरोग्य तपासणी, पोषण आहार वाटप आणि रेकॉर्ड लिहून मासिक अहवाल सादर करणे ही दैनंदिन कामे अंगणवाडी सेविकांना करावी लागत आहे. त्यामुळे अंंगणवाडीतून मिळणारे शिक्षण नामामत्र ठरत आहे.
वरिष्ठांनी लक्ष देवून रिक्त पदे भरुन बालविकास प्रकल्प कार्यालयाला गती द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Rambhrose Project Office of Sindhiya Balavikas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.