बहुप्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाची झड
By Admin | Updated: August 31, 2014 23:40 IST2014-08-31T23:40:57+5:302014-08-31T23:40:57+5:30
जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. आॅगस्ट महिना संपत आला तरी पावसाचे चिन्ह नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकही हैराण झाले होते. मात्र गणरायाचे आगमन होताच वरूणराजाही सक्रिय झाला आहे.

बहुप्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाची झड
शेतकऱ्यांना दिलासा : गणरायाच्या आगमनासह पावसाचेही पुनरागमन
चंद्रपूर : जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. आॅगस्ट महिना संपत आला तरी पावसाचे चिन्ह नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकही हैराण झाले होते. मात्र गणरायाचे आगमन होताच वरूणराजाही सक्रिय झाला आहे. गणेश चतुर्थीपासून पावसाने पुन्हा पुनरागमन केले. यावेळी तो दमदार पडला. शनिवारी रात्री बऱ्यापैकी पाऊस पडला. रविवारी दिवसभरच पावसाची झड कायम होती. यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यावर्षी पावसाबाबत चंद्रपूर जिल्हा निराशाजनक राहिला. पावसाच्या जून, जुलै व आॅगस्ट या महिन्यातच पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांचा जणू घसाच कोरडा झाला. पिके संकटात सापडली. कसे होणार या विवंचनेत शेतकरी सापडला होता. याशिवाय जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातही जलसाठा कमी होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनही अडचणीत आले होते. पावसाने यंदा प्रारंभापासूनच सर्वांचा जीव टांगणीला ठेवला. यावर्षी जून महिन्यात मृग नक्षत्र कोरडा गेला. त्यानंतरही पाऊस पडला नाही. जून महिन्यात केवळ सरासरी ६१.४२ मिमी पावसाची नोंद झाली. जून महिन्यातील पावसाची टक्केवारी सरासरीच्या तुलनेत केवळ ३३ टक्के होती. जूलै महिन्यात पाऊस सरासरी ओलांडून बरसतो, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यंदा या पावसाच्या महिन्यातही पावसाने दगा दिला. जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३९७.८४ मिमी पाऊस पडायला हवा. दरवर्षी याहून अधिकच पाऊस पडतो. मात्र यावर्षी जुलै महिन्यात पाऊस सरासरीपर्यंतही पोहचू शकला नाही. या महिन्यात ३०८.१७ मिमी पावसाची नोंद झाली. सरासरी टक्केवारी ७७ एवढी होती. आॅगस्ट महिना देखील पावसाचाच महिना आहे. या महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३४३.१६ मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात या महिन्यात केवळ ८५.७९ मिमी पाऊस पडला. आॅगस्ट महिन्यात पावसाची टक्केवारी केवळ २५ एवढी आहे. जिल्ह्यातील जिवती, कोरपना, राजुरा, चिमूर, भद्रावती, वरोरा, चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक कमी पाऊस पडला आहे.
दरम्यान, गणरायाचे आगमन होताच पावसाचेही पुनरागमन झाले. गणेश चतुर्थीच्याच दिवशी बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस पावसाळी वातावरण कायम राहिले. काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडतच राहिला. त्यानंतर आज रविवारी जोरदार पाऊस नसला तरी सकाळपासूनच पावसाची झड होती. दिवसभर सूर्याचे दर्शन झाले नाही. ३१ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात ४३५.८० मिमी पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक पाऊस गोंडपिपरी तालुक्यात पडला. या तालुक्यात ५९.२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ चंद्रपूर, सावली, भद्रावती, वरोरा, नागभीड, राजुरा, जिवती तालुक्यातही बऱ्यापैकी पाऊस झाला. (शहर प्रतिनिधी)