पावसाने मिळाला बळीराजाला दिलासा

By Admin | Updated: July 24, 2015 01:02 IST2015-07-24T01:02:27+5:302015-07-24T01:02:27+5:30

गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

Rainfall brings relief to the victims | पावसाने मिळाला बळीराजाला दिलासा

पावसाने मिळाला बळीराजाला दिलासा

धानाच्या रोवणीला वेग : शेतपिकांना आला बहर
चंद्रपूर/मूल/ब्रह्मपुरी : गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. ब्रह्मपुरी, मुल तालुक्यात रोवणीच्या कामांना वेग आला असून इतरही ठिकाणी पावसाने पिकांना बहर आली आहे. गेल्या २४ तासात ९८७.४ मिमी पावसाची नोंद झाली.
मूल तालुक्यात तब्बल १९ दिवसानंतर पाऊस झाला. गेल्या चोविस तासात ९६.६ मिमी पावसाची नोंद तालुक्यात झाली. त्यामुळे चिंतातूर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. शेतातील पेरलेले धानाचे पऱ्हे करपायला लागल्याने शेतकरी पुरता खचला होता. दुबार पेरणी करावी लागणार काय, या चिंतेत असताना वरुण राजाचे आगमन झाल्याने बळीराजा काही प्रमाणात सुखावण्याचे चित्र दिसत आहे.
तालुक्यात २४०० हेक्टर क्षेत्र पिकाखाली असून २०१३.५९ हेक्टर आर क्षेत्रात धानाची लागवड लावण्यात आली आहे. तर ३४१ हेक्टर आर क्षेत्रात आवत्या, सोयाबीन १११२ हेक्टर, कापूस ७५ हेक्टर तर तूर ४३८ हेक्टर आर मध्ये लावण्यात आले आहे. धानाची पेरणी केल्यानंतर तब्बल १९ दिवस पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था दयनीय होती.
तर ब्रह्मपुरी तालुक्यात बुधवारी २८.८ मिमी पावसाची नोंद झाली. धान या पावसाने रोवणी कामाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील खरीप पिकांचे क्षेत्र २९ हजार ४६० हेक्टर असून जवळपास १५ हजार हेक्टर जमिनीवरील रोवण्या पावसाने खोळंबल्या होत्या. धानपिकांचे पऱ्हे कोमजलेल्या अवस्थेत होते. परंतु बुधवारी २८.८ मिमी पाऊस झाल्याने रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गावखेड्यात रोवणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता असताना ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या वेगही वाढल्याने शेतकऱ्यांसमोर पहिले रोवणी पूर्ण करण्याचा कल असल्याचे दिसून येत आहे. पावसाने मारलेली दडी सर्वच स्तरातील लोकांना चिंतेचा विषय असताना कालच्या पावसाने थोडी मुक्तता मिळवून दिली आहे.
मात्र पावसाची उघडझाप सुरू असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतरही अनेकांच्या घरातील कुलर अद्याप सुरू आहेत. (प्रतिनिधी)
वीज पडल्याने लाखोंचे नुकसान
मारोडा : मूल तालुक्यात बुधवारी मुसळधार व विजांच्या कडकडाटसह पाऊस झाला. कमलाकर गडपल्लीवार यांच्या घरावर मध्यरात्री वीज कोसळल्याने त्यांचे व शेजाऱ्यांच्या घरातील विजेवर चालणारी उपकरणे निकामी झालीत. टीव्ही संच, फ्रिज, मीटर व विद्युत बोर्डचे नुकसान झाले. शेजारी राहणाऱ्या लक्ष्मी तुम्मे, सतीश खोबरे, दिलीप नेरलवार, वासुदेव शंखदरवार यांचे टी.व्ही. संच निकामी झाले. या नैसर्गिक आपत्तीत जीवहानी टळली असली तरी लाखोंचे नुकसान झाले आहे.

Web Title: Rainfall brings relief to the victims