चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By Admin | Updated: August 18, 2014 23:24 IST2014-08-18T23:24:01+5:302014-08-18T23:24:01+5:30

पावसाअभावी शेतपिके संकटात सापडली आहेत. याबरोबरच शेतातील हिरव्या चाऱ्यावरही परिणाम होताना दिसत असून चारा टंचाई व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

The question of fodder and drinking water is serious | चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

रत्नाकर चटप - लखमापूर
पावसाअभावी शेतपिके संकटात सापडली आहेत. याबरोबरच शेतातील हिरव्या चाऱ्यावरही परिणाम होताना दिसत असून चारा टंचाई व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध सुका चारा व कुटाराचा वापर करून जनावरे जगवली. त्यानंतर उन्हाळ्यात याचाच वापर करण्यात आला. काही शेतकऱ्यांनी चारा विकत घेऊन जनावरांना खाऊ घातला. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने सुरूवातीला शेताच्या बांध्यावर हिरवा चारा दिसून आला. परंतु जनावरांच्या चराईनंतर पाऊस नसल्याने हिरव्या चाऱ्याची वाढ होत नसल्याचे दिसते. अशातच तूर, सोयाबीन, ज्वारी आदी पिके संकटात असल्याने यातून मिळणाऱ्या चाऱ्याची शक्यता मावळली आहे. पिके वाढणार नाही तर चारा कुठून तयार करायचा, असाही सूर आता शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे. यातच काही गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अनेक गावात छोटे नाले, विहिर, डबके यातून नागरिक दैनंदिन लागणाऱ्या पाण्याचा उपसा करतात. मात्र पाऊस नसल्याने पाण्याची पातळी खालावत आहे. जिवती तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तर कोरपना तालुक्यातील काही गावांना अनियमित पाण्याचा पुरवठा होत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्धपालन व पशुपालन करतात. त्यामुळे साधारणत: एका शेतकऱ्याकडे दोन बैल, एक गाय, वासरू, बकरी आदी जनावरे असतात. मात्र आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न पुढे दिसत असल्याने मोठ्या शेतकऱ्यासह लहान शेतकरी बाजारात जनावरांची विक्री करताना दिसत आहे. शेतकऱ्यांपुढे स्वत:च्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पुढे असताना जनावरांचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल आता उपस्थित होत आहे. पूर्वी शेतीचे आकारमान अधिक असल्याने व चारा क्षेत्र आरक्षित असल्याने शेतकऱ्यांकडे जनावरांचे प्रमाण अधिक असायचे. मात्र आता हे प्रमाण घटले असून पशुपालन व दुग्ध व्यवस्थापन धोक्यात आले आहे. यावर्षी पाण्याचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. शेतात पिक होईल की नाही, पाऊस आला तर बरे नाही तर काही नाही. अशी चिंता शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे काही शेतकरी आपली आर्थिक गरज भागविण्यासाठी जनावरांची विक्री करीत आहे. राजुरा, कोरपना, गडचांदूर आदी आठवडी बाजारातून शेकडो जनावरांची विक्री केली जात असून जनावरे कत्तलखान्याकडे जात आहे. इच्छा नसताना शेतकऱ्यांना नाईलाजास्तव जनावरे विक्रीला काढावी लागत आहे. दुष्काळामुळे हिरवा चारा व कुटाराची मोठी समस्या येत्या काही महिन्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना आधीच धान्य घेऊन कुटुंबाला जगवावे लागते. यातच जनावरांच्या पालनपोषणाचा प्रश्नही अत्यंत गंभीर होताना दिसत आहे. उन्हाळ्यात अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती पाऊस न आल्याने काही गावात आता निर्माण होत आहे. नदी, नाले, डबक्यात पाणी कमी दिसत असल्याने जनावरांना कसे पाजावे हा यक्ष प्रश्न आहे. शेतकऱ्यांची अशी परिस्थिती असल्याने शेतकरी जनावरे विक्री करीत आहे तर याचाच फायदा घेत अनेक व्यापारी आंध्रप्रदेशातील आदिलाबाद, आसीफाबाद, कागजनगर, बेला आदी ठिकाणाहून बाजारातून जनावरे खरेदी करीत आहे. अडचणीमुळे शेतकरी मिळेल त्या भावात जनावरे विकत असून सदर जनावरांची आंध्रप्रदेशातील कत्तलखान्याकडे रवानगी होत असल्याचे समजते.

Web Title: The question of fodder and drinking water is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.