घुग्घूस नगर परिषदेचा प्रश्न ऐरणीवर
By Admin | Updated: August 3, 2014 23:19 IST2014-08-03T23:19:24+5:302014-08-03T23:19:24+5:30
घुग्घूस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळावा म्हणून मागील पंधरा वर्षांपासून नागरिकांंची मागणी आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी नागरिकांत असंतोष निर्माण झाला

घुग्घूस नगर परिषदेचा प्रश्न ऐरणीवर
घुग्घूस : घुग्घूस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळावा म्हणून मागील पंधरा वर्षांपासून नागरिकांंची मागणी आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी नागरिकांत असंतोष निर्माण झाला असून आता नगर परिषदेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्राम पंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळावा म्हणून संघर्ष समितीचेही गठण करण्यात आले आहे.
चंद्रपूर तालुक्यात घुग्घूस ग्रामपंचायत मोठी असून औद्योगिक गाव म्हणून ओळखले जाते. येथे वेकोलिची कोळसा खाण, सिमेंट कारखाना आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे नागरिक सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातही शासनाकडून येणारा निधी कमी मिळत असल्याने विकास कामात अडचण निर्माण होत आहे.
या ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळावा यासाठी पक्ष पातळीवर अनेकवेळा आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन शासनदरबारी पाठविण्यात आले. परंतु लोकप्रतिनिधी तथा शासनाने येथील नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
स्थानिक ग्रामपंचायतीने ग्रामसभा, मासिकसभा या माध्यमातून अनेकवेळा ठराव करून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. निवडणुकीत लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासनाचा पाऊस पाडण्यात आला. परंतु इच्छाशक्तीच्या अभावामुळे व ठोस पाठपुराव्याअभावी येथील नगरपालिकेचा भिजत घोंगडे आहे. नगर परिषदेच्या मागणीकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)